कॅलिफोर्निया – शत्रूचे रडार सेंसर निकामी करून लढाऊ विमान नष्ट करण्याची क्षमता असलेल्या अतिप्रगत लेझर यंत्रणेची अमेरिकन नौदलाने चाचणी घेतली. ‘युएसएस पोर्टलँड’ या युद्धनौकेवर तैनात लेझरने ड्रोन विमान यशस्वीरित्या भेदले. पर्ल हार्बर बेटावर तैनात असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेने ही चाचणी घेतली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वातावरण तापलेले असताना अमेरिकेच्या युद्धनौकेची ही चाचणी लक्षवेधी ठरते.
अमेरिकेच्या नौदलाने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये ‘लेझर वेपन सिस्टीम डेमोंस्टेटर’ (एलडब्ल्यूएसडी) या लेझर यंत्रणेने इंडो पॅसिफिकच्या सागरी क्षेत्रात घिरट्या घालणारे ड्रोन यशस्वीरित्या भेदल्याचे दाखविले आहे. फक्त ड्रोनच नाहीतर विनाशिका भेदण्यासाठी उपयुक्त ठरणारी सदर लेझर यंत्रणा अमेरिकी नौदलाच्या सामर्थ्यात प्रचंड वाढ करणारी ठरेल, असा दावा यूएसएस पोर्टलँडचे कॅप्टन केरी सँडर्स यांनी केला. अमेरिकेच्या नॉर्थरॉप ग्रुमन या कंपनीने तयार केलेली ही लेझर यंत्रणा गेल्यावर्षीच सदर युद्धनौकेवर तैनात करण्यात आली होती. याची सागरी चाचणी शुक्रवारी करण्यात आली.
अमेरिकेच्या नौदलात याआधी ३० किलो वॅट या क्षमतेने मारा करणारी लेझर यंत्रणा तैनात आहे. या लेझरने ड्रोन भेदता येतात. पण यूएसएस पोर्टलँड या युद्धनौकेवर अतिप्रगत लेझरमधून बाहेर पडणारे १५० किलोवॅट्सची लेझर्स विमानांना देखील लक्ष्य करू शकते. याव्यतिरिक्त अमेरिकी नौदल हेलिओस या आणखी एका लेझर यंत्रणेची निर्मिती करीत आहे. सदर लेझर यंत्रणा अमेरिकी नौदलाच्या विनाशिकांवरही तैनात करता येईल. त्यामुळे येत्या काळात अमेरिकन नौदलाच्या विनाशिका आणि युद्धनौका लेझर यंत्रणेने सुसज्ज होतील.
दरम्यान, काही दिवसांपासून अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या नौदलाची तैनाती वाढविली आहे. या क्षेत्रातील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी ही तैनाती असल्याचे अमेरिकेचे नौदल अधिकारी जाहीरपणे सांगत आहेत. अशा परिस्थितीत, या अतिप्रगत लेझर यंत्रणेची चाचणी करण्यासाठी पर्ल हार्बर बेटावरील आपल्या युद्धनौकेचा वापर करून अमेरिकेने चीनला संदेश दिल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |