बीजिंग – कोरोना साथीच्या काळातही ‘साऊथ चायना सी’मध्ये आपली अरेरावी कायम ठेवणाऱ्या चीनने आता त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही वर्षात साऊथ चायना सी मध्ये आक्रमक लष्करी तैनाती करणाऱ्या चीनने या सागरी क्षेत्रावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ (एडीआयझेड) लागू करण्याची तयारी केली आहे. चिनी तसेच तैवानी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देत असल्याचा दावा हॉंगकॉंगस्थित दैनिकाने केला. यापूर्वी २०१३ साली चीनने जपाननजीक असलेल्या ‘ईस्ट चायना सी’ सागरी क्षेत्रात ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ ची घोषणा केली होती.
हॉंगकॉंगसाठी मंजूर केलेला नवा सुरक्षा कायदा, तैवानवरील आक्रमणाबाबत चीनचे लष्करी अधिकारी व अभ्यासगटांकडून करण्यात येणारी वक्तव्ये आणि शेजारी आशियाई देश तसेच अमेरिकेच्या युद्धनौकांविरोधात साऊथ चायना सी क्षेत्रातील अरेरावीच्या घटना चीनच्या आक्रमक इराद्यांची जाणीव करून देत आहेत. या पार्श्वभूमीवर, चीनने साऊथ चायना सीमध्ये आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘एडीआयझेड’ घोषित करण्याबाबत केलेली तयारी महत्वाची ठरते.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात केलेल्या एका निवेदनात चीन अशी तयारी करत असल्याची आपल्याला कल्पना आहे, असे सांगितले होते. याबाबत अधिक खुलासा करताना तैवानचे माजी नौदल अधिकारी ‘लु ली-शिह’ यांनी चीनकडून ‘एडीआयझेड’च्या योजनेवर गेल्या १० वर्षांपासून काम सुरू असून कृत्रिम बेटांचे बांधकाम व त्यावर लष्करी तळांची उभारणी याच योजनेचा भाग आहे, असा दावा केला. ‘ली-शिह’ यांनी यावेळी, चीनच्या लष्कराकडून कृत्रिम बेटांवर उभारलेल्या लष्करी तळांवर नुकतीच प्रगत टेहळणी विमाने तसेच गस्ती विमानांची तैनाती झाली आहे याकडे लक्ष वेधले.
हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने या संदर्भात दिलेल्या वृत्तात, चीनच्या लष्करातील सुत्रांनीही ‘एडीआयझेड’ची तयारी व त्याच्या घोषणेसंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, साऊथ चायना क्षेत्रातील प्रस्तावित झोनमध्ये इतर देशांनी हक्क सांगितलेल्या क्षेत्राचाही समावेश असणार आहे. त्यात तैवानने दावा केलेल्या ‘प्रतास आयलंड’ सह ‘स्प्रेटले’ व ‘पॅरासेल आयलंड’ या बेटांचाही समावेश आहे. या बेटांवर अनुक्रमे फिलिपाइन्स, मलेशिया व व्हिएतनाम या देशांनी दावा सांगितला आहे. चीन चे माजी लष्करी अधिकारी ली जिए यांनीही ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ घोषित करण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींना दुजोरा दिला.
चीनकडून ही तयारी सुरू असतानाच अमेरिकेनेही साऊथ चायना सी क्षेत्रातील आपल्या हालचालींना अधिक वेग दिल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यात अमेरिकेच्या तीन विनाशिकांनी साऊथ चायना सी क्षेत्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये गस्त घातली होती. अमेरिकेच्या लष्करी तसेच टेहळणी विमानांनीही साऊथ चायना सी क्षेत्रातून एक महिन्याच्या कालावधीत जवळपास नऊ वेळा उड्डाण केल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. अमेरिकेच्या या हालचाली आणि चीनकडून सुरू असलेली तयारी या पार्श्वभूमीवर साऊथ चायना सी क्षेत्रातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळेल असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |