तैपेई – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे नेते व लष्करी अधिकारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना तैवानवर हल्ला चढविण्याचे सल्ले देत आहेत. चीनचे लष्कर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा सराव करीत असून चीनच्या नौदलाने तैवानच्या आखाताजवळील आपल्या विनाशिकांच्या गस्तीत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी तैवान अमेरिकेकडून विनाशिकाभेदी हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. आठवडाभरापूर्वीच अमेरिकेने तैवानला पाणबुडीभेदी टॉर्पेडो पुरवण्याचे जाहीर केले होते.
बदलत्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तैवानच्या किनारपट्टीला शत्रू देशाकडून धोका संभवतो, असा इशारा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात दिला होता. आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी वेळीच पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगून तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून विनाशिकाभेदी हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे सुचविले होते. अद्याप तैवानने अमेरिकेकडे याची अधिकृतरित्या मागणी केलेली नाही. पण, तैवान येत्या काळात हार्पूनची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी बोईंगकडे या क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबत विचारणा करील, अशी माहिती तैवानचे उपसंरक्षणमंत्री ‘चँग चे पिंग’ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गेल्या आठवड्यातच अमेरिकेने तैवानला १८ कोटी डॉलर्स करारानुसार प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेले ‘एमके-४८’ टॉर्पेडो पुरविरण्याचे जाहीर केले होते. या करारांतर्गत अमेरिका तैवानला पाणबुडीभेदी अठरा टॉर्पेडो पुरविणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सदर टॉर्पेडो तैवानच्या नौदलात दाखल होतील, असा दावा केला जातो. तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा करणार्या चीनने अमेरिका व तैवानमधील या संरक्षण व्यवहारावर तीव्र आक्षेप घेतला होता. पुढच्या दोन दिवसात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा बड्या नेत्यांनी तैवानवर ताबा मिळवण्यासाठी हल्ला चढविण्याचा सल्ला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला. यासाठी आपले लष्कर सज्ज असल्याचा दावा चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला होता. अवघ्या महिन्याभरात दुसऱ्यांदा चीनच्या नेत्यांनी तैवानचा ताबा घेण्याचा इशारा दिल्यामुळे या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, तैवानने अमेरिकेकडे विनाशिकाभेदी हार्पून क्षेपणास्त्रांची मागणी करून चीनला उत्तर दिल्याचे दिसत आहे. याव्यतिरिक्त तैवानने आपल्या सागरी क्षेत्रातील तसेच ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील विनाशिकांच्या गस्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |