वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या नौदलाकडून साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’ भागात सराव सुरू असताना अमेरिकेने त्याच क्षेत्रात आपल्या दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौकांसह इतर युद्धनौका धाडल्याचे समोर आले आहे. चीनचा सराव रविवारपर्यंत सुरू राहणार असून अमेरिका आपला सराव शनिवारपासून सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. अमेरिका व चीनने एकाच वेळी एकाच भागात सराव करण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना आहे. सध्या या दोन देशांमध्ये चिघळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या छोट्याशा दुर्घटनेतून संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशारा विश्लेषकांनी दिला. चीनने सुरू केलेल्या सरावावर ‘आसियन’ देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. त्यात हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी आणलेला कायदा आणि तैवानवरील आक्रमणाच्या धमक्या यांची भर पडली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रावरील वर्चस्वासाठी चीन ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ लागू करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. पॅरासेल आयलंड’ भागात चीनने बुधवारपासून सुरू केलेला सरावही या क्षेत्रातील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या हालचालींचा भाग मानला जातो.
चीनच्या या अरेरावीला रोखण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात व्यापक संरक्षण तैनाती सुरू केली आहे. एप्रिल महिन्यापासून अमेरिकेने या क्षेत्रातील आपल्या युद्धनौका, विनाशिका, लढाऊ विमाने, ड्रोन्स, टेहळणी विमाने व बॉम्बर्सच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेल्या ऑस्ट्रेलिया व जपान यासारख्या देशांबरोबर सातत्याने सरावही सुरू आहेत. मे महिन्यात एकाच वेळी तीन विमानवाहू युद्धनौका व त्यांच्याबरोबरील ‘कॅरिअर स्ट्राइक ग्रुप्स’ साऊथ चायना सी मध्ये तैनात करून अमेरिकेने चीनला सज्जड इशारा दिला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनचा सराव सुरू असलेल्या भागातच आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका रवाना करून अमेरिकेने चीनवरील दडपण अधिकच वाढविले आहे. यापूर्वीही साऊथ चायना सीमध्ये अमेरिका व चीनचे नौदल एकमेकांसमोर येण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांश घटना चीनच्या नौदलाने अमेरिकी युद्धनौकांचा मार्ग रोखण्याचा किंवा जाणूनबुजून चिथावणी देण्याचा प्रयत्न, या स्वरूपातील आहेत. काही महिन्यांपूर्वी मलेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी युद्धनौकांना रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या युद्धनौका पाठवण्याची घटनाही घडली होती. मात्र चीनचा सराव सुरु असतानाच अमेरिकेने त्याच भागात आपल्या दोन विमानवाहू युद्धनौकांसह इतर युद्धनौकांचा ताफा काढण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.
सध्या अमेरिका व चीन या दोन्ही देशांमधील तणाव जबरदस्त चिघळला असून द्विपक्षीय संबंध रसातळाला गेल्याचे मानले जाते. अशा स्थितीत दोन्ही देशांचे नौदल परस्परांसमोर खडे ठाकल्यास एखादी दुर्घटना घडून संघर्षाचा भडका उडू शकतो असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. सागरी क्षेत्रातील संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वी करार केला असला, तरी सध्याच्या स्थितीत ठिणगी उडण्याचा धोकाच जास्त आहे, अशी भीती ब्रिटनस्थित अभ्यासगटातील तज्ञ ‘लिन कुओक’ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चीनने सुरू केलेल्या नौदल सरावावर व्हिएतनाम व फिलिपाइन्स या दोन आसियन देशांनी टीकास्त्र सोडले आहे. चीनचा सराव व्हिएतनामच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा असून, हे वर्तन आसियन देशांबरोबरील संबंधांचा आदर ठेवणारे नाही, असे व्हिएतनामच्या प्रवक्त्यांनी बजावले. फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयानेही एक स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात चीनचा सराव चिथावणीखोर असल्याचा दावा केला. चीनच्या आक्रमक हालचाली आग्नेय आशियाई देशांसाठी धोक्याचा इशारा आहे असेही फिलिपाईन्सने म्हटले आहे. व्हिएतनाम व फिलिपाईन्सने चीनविरोधात घेतलेल्या या भूमिकेचे अमेरिकेने स्वागत केले असून सहकार्याची ग्वाही दिली आहे.
साऊथ चायना सी पाठोपाठ आशियातील इतर देशांकडूनही चीनच्या अरेरावीला आता आव्हान मिळू लागले आहे. काही दिवसांपूर्वी चीनने एका जागतिक बैठकीत भूतानच्या भागावर आपला हक्क सांगितला होता. त्यावेळी भारतासह इतर देशांनी चीनचा हा दावा उडवून लावला होता. आता भूताननेही याविरोधात चीनकडे थेट नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. भूतान सरकारने अधिकृतरित्या चीनविरोधात राजनैतिक स्तरावर निषेध व्यक्त केला असून त्यासंदर्भात निवेदनही प्रसिद्ध केले आहे.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |