वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्ती असणाऱ्या अमेरिकेला उलथवून त्याची जागा घेण्यासाठी चीनने आर्थिक पातळीवर आक्रमक व झंझावाती मोहीम सुरू केली आहे, असा घणाघाती आरोप अमेरिकेचे ॲटर्नी जनरल विल्यम बार यांनी केला. अमेरिकेतील अनेक महत्त्वाची व संवेदनशील उद्योग क्षेत्रे चीनच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून हे अवलंबित्व देशासाठी धोकादायक आहे असा इशाराही बार यांनी दिला. यावेळी अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलनी, चीनच्या राजवटीची लुटारू व शिकारी प्रवृत्तीची धोरणे माहीत असतानाही त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्याच आठवड्यात, अमेरिकेची मुख्य तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ अर्थात ‘एफबीआय’च्या प्रमुखांनी, चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या कारवाया अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बजावले होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे स्वीकारल्यापासून सातत्याने चीनविरोधात भूमिका घेतली होती. गेल्या तीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चीनला लक्ष्य करणारे निर्णय घेतले आहेत. यावर्षाच्या सुरुवातीपासून जगभरात लाखो बळी घेणाऱ्या कोरोना साथीमागेही चीनच सूत्रधार असल्याचा आरोप करून अमेरिकेने सध्या चीनविरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला असून अमेरिकी जनतेलाही चीनच्या कारस्थानाची माहिती करून देण्यासाठी प्रचार मोहीम आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन चीनच्या धोक्याकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. गेल्या महिन्याभरात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन तसेच एफबीआयच्या प्रमुखांनी चीनच्या कारवायांची माहिती दिली होती.
ॲटर्नी जनरल बार यांनी, मिशिगनमधील ‘फोर्ड प्रेसिडेन्शियल म्युझियम’मध्ये केलेले वक्तव्य ट्रम्प प्रशासनाच्या याच मोहिमेचा भाग ठरतो. अर्थ व व्यापार क्षेत्रातील चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या कारवायांचा उल्लेख करताना बार यांनी, ‘मेड इन चायना २०२५’, ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ व ‘डिजिटल सिल्क रोड’ या महत्वाकांक्षी योजनांकडे लक्ष वेधले. कम्युनिस्ट राजवटीच्या या योजना म्हणजे उत्पादन, व्यापार व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर एकतंत्री वर्चस्व मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेचा हिस्सा आहेत, याची जाणीव अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलनी करून दिली. चीनचा कम्युनिस्ट पार्टीच्या या महत्त्वाकांक्षांना अमेरिका कसा प्रतिसाद देते हा संपूर्ण जगासाठी २१व्या शतकातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असा दावाही ॲटर्नी जनरल बार यांनी केला.
‘जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवून अमेरिकेचे स्थान बळकावण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या कारवायांची तीव्रता वाढविली आहे. बौद्धिक संपदेची चोरी, हेरगिरी, घातपात, सायबरहल्ले, परदेशी कंपन्या ताब्यात घेण्यासाठी चिनी कंपन्यांना देण्यात येणारे सहाय्य व चलनाच्या मूल्यातील फेरफार यासारख्या अनेक मार्गांनी हेच सुरु आहे. चीनला जगातील इतर प्रगत अर्थव्यवस्थांशी बरोबरी करायची नसून त्यांना बाजूला सारून एकतर्फी वर्चस्व मिळवायचे आहे’, अशा शब्दात अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलनी कम्युनिस्ट राजवटीचा कारवायांबाबत इशारा दिला. यावेळी त्यांनी, चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला जगातील हुकूमशाहीचे शस्त्रागार या शब्दात लक्ष्य केले.
चिनी राजवटीच्या कारवायांवर टीकास्त्र सोडतानाच या राजवटीशी हातमिळवणी करून साथ देणाऱ्या अमेरिकी कंपन्यानाही विल्यम बार यांनी धारेवर धरले. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकी कंपन्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू, ॲपल व सिस्को यांनी आर्थिक लाभासाठी चीनच्या राजवटीचे लांगुलचालन करण्याची भूमिका स्वीकारली, असा खरमरीत आरोप अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलनी केला. यावेळी त्यांनी अमेरिकेतील चित्रपटसृष्टी म्हणून ओळख असणाऱ्या हॉलीवूडचेही वाभाडे काढले. चीनची कम्युनिस्ट पार्टी अमेरिकेच्या भावी पिढीच्या भवितव्यावर नियंत्रण मिळविण्याची मोहीम राबवित असून, अमेरिकेने एक देश म्हणून एकजूट होऊन त्याचा मुकाबला करायला हवा, असे आवाहन ॲटर्नी जनरल बार यांनी अखेरीस केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |