अमेरिकेला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून असलेल्या धोक्याची जाणीव झाली – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अमेरिकेला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून असलेल्या धोक्याची जाणीव झाली – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

वॉशिंग्टन – अमेरिकेकडून ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’बाबत दाखवण्यात येणारी निष्क्रियता व भाबडेपणाचे दिवस आता संपले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया आणि धोक्याची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे’, अशा थेट व आक्रमक शब्दात अमेरिकेचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी चीनच्या सत्ताधाऱ्यांना खडसावले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी यावेळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतःला दिवंगत रशियन हुकुमशहा जोसेफ स्टालिन यांचे वारसदार समजतात, असा टोलाही लगावला.

जगभरात लाखो बळी घेणाऱ्या कोरोना साथीमागे चीनच सूत्रधार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला असून जगातील इतर देशांनाही कोरोनासह इतर चिनी धोक्यांची जाणीव करून देण्यात येत आहे. चीनच्या अमेरिकेतील कारवाया रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वाचे व मोठे निर्णय घेतले असून अमेरिकी जनतेला चीनच्या कारस्थानाची माहिती करून देण्यासाठी प्रचार मोहीम आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन चीनबाबतची भूमिका मांडणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ओब्रायन यांनी चीनवर सोडलेले टीकास्त्र त्याची सुरुवात असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, ॲटर्नी जनरल विल्यम बार व तपासयंत्रणा ‘एफबीआय’ चे संचालक ख्रिस्तोफर रे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी जनतेत चीनविरोधात तीव्र असंतोष असून या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेले हे प्रयत्न लक्ष वेधून घेणारे करतात.

‘अमेरिकेचे लक्ष्य चीनची जनता नाही तर चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आहे. दिवसेंदिवस संपन्न होणाऱ्या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आपल्या जनतेच्या लोकशाहीवादी आकांक्षांना मोकळा श्वास घेऊ देईल अशी अमेरिकेची धारणा होती. या धाडसी विचारामागे अमेरिकेने सोव्हिएत रशियातील कम्युनिझमवर मिळविलेला विजय आणि प्रचंड आशावाद याचे पाठबळ होते. दुर्दैवाने अमेरिकेची ही धारणा भाबडी असल्याचे सिद्ध झाले’, असे सांगून ओब्रायन यांनी चीनबाबतचे अमेरिकेचे धोरण हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे सर्वात मोठे अपयश मानावे लागेल असा दावा केला.

‘चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला त्यांच्या तत्त्वांनुसार जगाची पुनर्रचना करायची असून चीनच्या सीमांपलीकडे राहणाऱ्या लोकांच्या विचारांवरही नियंत्रण मिळवायचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची ही धोरणे अमेरिकी जीवनशैली व मूल्यांसाठी अत्यंत घातक आहेत. अमेरिकेचे लक्ष्य चीन किंवा चीनमधील जनता नसून आमचा विरोध फक्त कम्युनिस्ट पार्टीला आहे आणि कम्युनिस्ट पार्टी म्हणजे चीन नव्हे’, अशा खरमरीत शब्दात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पुन्हा एकदा कम्युनिस्ट पार्टी कडून असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सहकारी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून असलेल्या धोक्याची जाणीव करून देत असतानाच अमेरिकी प्रशासनाकडून चीनच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईचा फास अधिकच आवळला जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बुधवारी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंध असणाऱ्या २० चिनी कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या ‘१९९९ नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अॅक्ट’नुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना या कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचे अधिकार आहेत. या कंपन्यांमध्ये हुवेई, हाईकव्हिजन, चायना मोबाईल, अॅव्हिक, पांडा इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही चिनी कंपन्यांवर प्रशासनाकडून आधीच निर्बंध टाकण्यात आले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info