शीतयुद्धाच्या काळातील रशियापेक्षाही चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा धोका अधिक भयंकर – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

शीतयुद्धाच्या काळातील रशियापेक्षाही चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा धोका अधिक भयंकर – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

प्राग, दि.१३ – ‘सध्या जगात जे काही घडते आहे ते शीतयुद्ध २.० नाही. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेत, राजकारणात आणि समाजव्यवस्थेत शिरकाव करण्यात यश मिळवले आहे. ही गोष्ट सोव्हिएत युनियनलाही जमली नव्हती. त्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांचा धोका शीतयुद्धाच्या काळातील रशियन संघराज्यापेक्षाही अधिक भयंकर आहे’,अशी घणाघाती टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा उल्लेख भस्मासुर असा करीत, जोरदार हल्ला चढविला होता.

माईक पॉम्पिओ

परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ सध्या पाच दिवसांच्या युरोप दौऱ्यावर असून त्याची सुरुवात झेक रिपब्लिकपासून झाली. चीनविरोधात अमेरिकेने उघडलेली आघाडी अधिक व्यापक करणे आणि अमेरिका व युरोपमधील सहकार्य मजबूत करणे हे या दौर्‍याचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुधवारी झेक रिपब्लिकच्या संसदेला संबोधित करताना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, या देशाने शीतयुद्धाच्या काळात रशियन कम्युनिझम विरोधात दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.

‘खोट्या माहितीचा प्रचार आणि सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून रशिया आजही झेक रिपब्लिकच्या लोकशाही व सुरक्षेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र चीनच्या राजवटीकडून या देशातील विविध क्षेत्रांमध्ये शिरकावासाठी सुरू असलेल्या हालचाली व नियंत्रणाचे प्रयत्न हा त्याहून अधिक मोठा धोका आहे. झेक रिपब्लिकच्या औद्योगिक क्षेत्रातील माहिती चोरली जात आहे. राजकीय नेते व सुरक्षा दलांच्या विरोधात प्रचारमोहिमा राबविण्यात येत आहेत. आर्थिक बळाचा वापर करून स्वातंत्र्य हिरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापारी वर्चस्वाचा वापर करून चीनची कम्युनिस्ट पार्टी अनेक देशांवर बळजबरी करीत आहे’, अशा शब्दात अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर जोरदार प्रहार केले.

माईक पॉम्पिओ

प्राग शहरातील मेयरनी तैवानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने झेक रिपब्लिकमधील एका गटाचा संगीताचा दौरा रद्द केला होता, याची आठवण यावेळी पॉम्पिओ यांनी करून दिली. ‘चार दशकांहून अधिक काळ कम्युनिस्ट राजवट अनुभवलेल्या झेक जनतेने पोलादी पडद्याआडचा त्रास सहन केला आहे. कम्युनिझम समाजव्यवस्था उद्ध्वस्त करून समाजाला कसा रसातळाला नेतो, हे या देशातील जनतेला चांगले माहित आहे. त्याविरोधात यापूर्वी या देशातील जनता जशी ठामपणे खडी ठाकली तसेच आताही सार्वभौमत्व व स्वातंत्र्यासाठी उभे राहण्याची गरज आहे’, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी झेक रिपब्लिकच्या संसदेत केले.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी सोडलेल्या या टीकास्त्राविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘पॉम्पिओ ज्या देशाला भेट देतात त्या देशात राजकीय विषाणू आणि खोट्या माहितीचा प्रसार करतात. चीन व चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीविरोधात त्यांच्याकडून करण्यात येणारी वक्तव्ये शीतयुद्धकालीन मानसिकता व स्वार्थी वृत्तीची निदर्शक आहेत’, असा आरोप चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info