वॉशिंग्टन – हुवेई, बाईटडान्स व टेंसेन्ट या बड्या कंपन्यांवर टाकलेल्या निर्बंधांनंतर आता अमेरिकेने अलिबाबासह इतर चिनी कंपन्यांनाही लक्ष करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, नुकतेच यासंदर्भात वक्तव्य केले असून चीनविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचाही इशारा दिला. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सोमवारी, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, हुवेईशी संबंधित असलेल्या ३८ कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करीत असल्याची घोषणा केली. ट्रम्प यांचा इशारा व त्यापाठोपाठ पॉम्पिओ यांनी केलेली घोषणा यामुळे अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक व वुईचॅट या प्रमुख चिनी ॲप्सवर निर्बंधांची घोषणा केली होती. टिकटॉक व वुईचॅट या चिनी ॲप्सची मालकी असणाऱ्या ‘बाईटडान्स’ तसेच ‘टेंसेन्ट’ या चिनी कंपन्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला अमेरिकी जनतेची खाजगी माहिती पुरवीत असल्याचा दावा ट्रम्प यांनी आपल्या वटहुकूमांमध्ये केला होता. या माहितीचा वापर ब्लॅकमेल तसेच हेरगिरीसाठी होऊ शकतो असे सांगून हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले होते. या कारवाईच्या वेळीच अमेरिकी प्रशासनातील सूत्रांनी इतर चिनी कंपन्यांवरही कारवाई होऊ शकते असे संकेत दिले होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे याला दुजोरा मिळाला आहे. ट्रम्प यांना पत्रकारांनी अलिबाबासारख्या बड्या चिनी कंपन्यांवर कारवाई होऊ शकते का असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्याबद्दल विचार चालू आहे व इतरही कारवाईसंदर्भातही प्रस्ताव आहेत असे उत्तर दिले. अलिबाबावर बंदीची घोषणा झाल्यास चीनच्या सत्ताधारी राजवटीला तो एक नवा धक्का ठरू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०१८ साली चीनविरोधात व्यापारयुद्धाची घोषणा केली होती. व्यापारयुद्धाअंतर्गत ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इंटरनेट क्षेत्रातील चिनी कंपन्यांच्या वर्चस्वाविरोधात कारवाईही सुरू केली होती. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ट्रम्प यांनी या मुद्द्यावर ‘इमर्जन्सी’ही जाहीर केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनविरोधात कारवाईची तीव्रता अधिकच वाढविल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सोमवारी हुवेई या चिनी कंपनीशी व्यवहार करणाऱ्या इतर ३८ कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करीत असल्याची घोषणा केली. अमेरिकेने यापूर्वी टाकलेल्या निर्बंधांनंतरही या चिनी कंपनीकडून त्यातून पळवाटा काढून कारवाया सुरू आहेत, आरोप करून पॉम्पिओ यांनी नव्या कारवाईचे समर्थन केले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेट क्षेत्रातील चीनच्या प्रभावाला धक्का देण्यासाठी ‘क्लीन नेटवर्क प्रोग्राम’ची घोषणा केली होती.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |