चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ‘रिम ऑफ पॅसिफिक’ युद्धसरावाला सुरुवात – ऑस्ट्रेलिया व फ्रान्ससह १० देशांचा समावेश  

चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ‘रिम ऑफ पॅसिफिक’ युद्धसरावाला सुरुवात – ऑस्ट्रेलिया व फ्रान्ससह १० देशांचा समावेश  

हवाई – कोरोनाची साथ व चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठा नौदल सराव म्हणून ओळखण्यात येणाऱ्या  ‘रिम ऑफ पॅसिफिक २०२०’ला सुरुवात झाली. यावर्षीच्या युद्धसरावात १० देशांच्या २२ युद्धनौका, पाणबुडी व पाच हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. यातील ऑस्ट्रेलिया व फ्रान्सचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या दोन्ही देशांनी गेल्या वर्षभरात चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवायांविरोधात आवाज उठवला असून, तैनाती वाढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

'रिम ऑफ पॅसिफिक'

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये लष्करी तैनाती वाढवितानाच अनेक भागांमध्ये घुसखोरीचे प्रयत्नही चीनकडून सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. त्यात हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी आणलेला कायदा व तैवानवरील आक्रमणाच्या धमक्या यांचीही भर पडली आहे.  चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेल्या भागात आपल्या लष्करी सामर्थ्याचे  प्रदर्शनही सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर, गेल्या महिन्यात अमेरिकेने साऊथ चायना सीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका जाहीर केली होती. या क्षेत्रातील इतर देशांच्या ताब्यातील भाग चीनने बळकावल्याचा आरोप ठेवून, अशा देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका ठामपणे उभी राहील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. अमेरिकेसह अनेक देशांना कोरोना साथीचा फटका बसला असतानाही आयोजित करण्यात आलेला ‘रिम ऑफ पॅसिफिक’ सराव अमेरिकेच्या या वचनबद्धतेचा भाग आहे, असा दावा संरक्षणदलातील अधिकाऱ्यांनी केला.

'रिम ऑफ पॅसिफिक'

‘रिम ऑफ पॅसिफिक २०२०’मध्ये अमेरिकेसह कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, न्यूझीलंड व ब्रूनेई हे देश सहभागी झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या या सरावात, सागरी क्षेत्रातील युद्धावर संपूर्ण भर असेल, अशी माहिती अमेरिकेच्या थर्ड फ्लीटचे कमांडर व्हाईस ॲडमिरल स्कॉट कॉन यांनी दिली. यात, ‘अँटी सरफेस अँड अँटी सबमरीन वॉरफेअर’, ‘इंटरडिक्शन ऑपरेशन्स’ व ‘लाईव्ह फायर इव्हेंट्स’चा समावेश असल्याचेही व्हाईस ॲडमिरल स्कॉट कॉन यांनी सांगितले.

यापूर्वी २०१८ साली झालेल्या ‘रिम ऑफ पॅसिफिक ‘ सरावात, २५ देशांच्या ४५ युद्धनौका, पाच पाणबुड्या व जवळपास २५ हजार जवान सहभागी झाले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info