अमेरिका चंद्राला अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र बनविण्याच्या प्रयत्नात – चीनच्या मुखपत्राचा आरोप

अमेरिका चंद्राला अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र बनविण्याच्या प्रयत्नात – चीनच्या मुखपत्राचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वी ‘स्पेस पॉलिसी डायरेक्टिव्ह-६’ची (एसपीडी-६) घोषणा केली. यानुसार अंतराळ मोहिमांना नवी गती देण्यासाठी अमेरिकेने ‘नासा’ला चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची परवानगी दिली आहे. २०२६ सालापर्यंत पूर्ण होणार्‍या या योजनेसाठी अमेरिकेचा ऊर्जा विभाग नासाला सहाय्य करणार आहे. पण अमेरिकेच्या या घोषणेवर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने आगपाखड केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे चंद्राला अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र बनविण्याची योजना असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला.

१६ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अंतराळ संशधोन क्षेत्रासाठी महत्त्वाचे ‘एसपीडी-६’ धोरण जाहीर केले. या धोरणाअंतर्गत ‘स्पेस न्युक्लिअर पॉवर अँड प्रपल्शन’चा (एसएनपीपी) लागू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, भविष्यात ‘स्पेस न्युक्लिअर सिस्टिम’वर आधारीत अंतराळमोहिम राबविण्यावर ‘नासा’ काम करणार आहे. पर्यायी ऊर्जास्त्रोत अपुरे पडत असताना, अंतराळ मोहिमांसाठी अंतराळातच अणुऊर्जेवर आधारीत अंतराळयान प्रक्षेपण करण्याची नासाची योजना आहे.

अणुऊर्जेवर आधारीत अंतराळ मोहिमांना पर्याय म्हणून सौरऊर्जेवर आधारीत मोहिमांचाही विचार करण्यात आला. पण चंद्रावर सौरऊर्जेचा पर्याप्त साठा करणे अवघड असल्यामुळे अणुऊर्जेवर आधारीत अंतराळ मोहिमांचा निर्णय घेतल्याचे नासाने म्हटले आहे. चंद्रावरुन प्रक्षेपित होणार्‍या या भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी नेमकी किती किलोवॅटची अणुभट्टी उभारणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत निरनिराळी माहिती समोर येत आहे. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नासाला चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची परवानगी दिल्यामुळे चीनची अस्वस्थता वाढली आहे.

चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या अमेरिकेच्या योजनेमागे लष्करी हेतू असल्याचा आरोप ‘साँग झाँपिंग’ या चीनच्या लष्करी विश्‍लेषकाने ‘ग्लोबल टाईम्स’शी बोलताना केला. चंद्रावर अणुभट्टी उभारून अमेरिका या ठिकाणी युरेनियमचे संवर्धन केंद्रही कार्यान्वित करणार आहे. युरेनियमचे संवर्धन म्हणजे चंद्राला अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र बनविण्यासारखे असल्याचा ठपका साँग यांनी ठेवला. त्याचबरोबर चंद्राच्या भूभागावर मोठ्या प्रमाणात ‘हेलिअम-३’ असल्याचे साँग म्हणाले.

‘हेलिअम-३’ या खनिजाचा वापर ‘न्यूक्लिअर फ्युजन’साठी इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीसाठी होऊ शकतो. त्यामुळे चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या नावाखाली अमेरिका या ठिकाणी अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र उभारू शकतो, अशी शक्यता साँग यांनी वर्तविली. तर ‘एसपीडी-६’ची घोषणा म्हणजे अंतराळक्षेत्रातील अमेरिकेची एकाधिकारशाही असल्याचा आरोप ‘चायना फॉरेन अफेअर्स युनिव्हर्सिटी’तील ‘इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’चे प्राध्यापक ली हेदाँग यांनी केला. अमेरिकेने चंद्रावर अणुचाचणी केली तर यामुळे चंद्रावर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा ठपका हेदाँग यांनी ठेवला.

याआधी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पुढाकाराने झालेल्या ‘आर्टेमिस करारा’लाही हेदाँग यांनी विरोध केला होता. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, युएई अशा आठ देशांचा समावेश असलेला हा करार अंतराळातील आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासंबंधीचा हा करार आहे. पण आर्टेमिस करार अमेरिकेला चंद्रावर तळ प्रस्थापित करण्यास सहाय्य करणारा असून हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप हेदाँग यांनी केला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info