बाखमतसह पूर्व युक्रेनमधील संघर्षाची तीव्रता अधिकच वाढली

- रशियाकडून सातत्यपूर्ण व मोठ्या हल्ल्यांचे सत्र सुरू

मॉस्को/बाखमत – रशियाकडून बाखमतसह पूर्व युक्रेनमध्ये होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढते आहे. रशियन फौजांनी बाखमत शहरावर तीन बाजूंनी हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनी लष्करासाठी हे शहर वाचविणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण ठरत असल्याचा दावा स्थानिक सूत्रे व माध्यमांकडून करण्यात येतो. शहरात जाणाऱ्या एका महत्त्वाच्या मार्गावर रशियाने ताबा मिळविल्याचेही सांगण्यात येते. बाखमतव्यतिरिक्त डोनेत्स्क प्रांतातील इतर शहरांवरही रशियाने आक्रमक हल्ल्यांचे सत्र सुरू केले असून खार्किव्ह भागात क्षेपणास्त्र तसेच रॉकेटस्‌‍चा मारा करण्यात येत आहे.

बाखमतसह

डोनेत्स्क प्रांतात मोक्याच्या जागी असलेले बाखमत हे शहर पूर्ण प्रांतावरील ताब्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. बाखमत हे शहर रशियासाठी ‘टॅक्टिकल व्हिक्टरी’ ठरु शकते, असा दावा पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांकडून करण्यात येतो. बाखमतवरील ताब्यानंतर रशिया डोनेत्स्कमधील क्रॅमाटोर्स्क व स्लोव्हिआन्स्क या शहरांवर मोठे हल्ले चढवू शकतात. त्यामुळे या शहरांसह डोनेत्स्क प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाखमतचा ताबा निर्णायक ठरतो. त्यामुळे गेल्या वर्षापासून रशियन फौजा सातत्याने हे शहर ताब्यात घेण्यासाठी हल्ले करीत आहेत.

बाखमतसह

रशियाच्या या प्रयत्नांना नव्या वर्षात यश मिळताना दिसत असून बाखमतनजिक असलेले सोलेदार हे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे. बाखमतला होणारा पुरवठा विस्कळीत करण्यातही रशियाला यश मिळाले असून शहरानजिकचे अनेक छोटे भाग रशियाने ताब्यात घेतले आहेत. शहरावर तीन बाजूंनी हल्ले सुरू असल्याचे रशियाकडून सांगण्यात येते. बाखमतमध्ये सध्या जवळपास सात हजार युक्रेनी जवान तैनात असल्याचे सांगण्यात येते.

बाखमतसह

बाखमतव्यतिरिक्त पूर्व युक्रेनमधील इतर भागांमध्येही रशियाचे हल्ले सुरू आहेत. खार्किव्ह भागात मंगळवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचे समोर आले. त्याचवेळी कुपिआन्स्क शहरानजिक रशियाकडून तोफा व रॉकेटस्‌‍चा माराही करण्यात आला. खेर्सन तसेच झॅपोरिझिआमधील युक्रेनच्या तळांवरही मोठे हल्ले करण्यात आले आहेत.

बाखमतसह

रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी नाटोवर टीकास्त्र सोडले आहे. पाश्चिमात्य देशांकडून देण्यात येणारी शस्त्रास्त्रे नाटोला अधिकाधिक प्रमाणात युक्रेन युद्धात खेचणारी ठरीत आहेत, असे शोईगू यांनी बजावले. गेल्या काही दिवसात नाटो सदस्य देशांनी युक्रेनला ‘हेवी वेपनरी’ पुरविण्यास सुरुवात केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जर्मनीसह इतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला जवळपास १०० ‘लिओपार्ड’ रणगाडे पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. त्याव्यतिरिक्त अमेरिका व ब्रिटनही युक्रेनला रणगाडे पुरविणार आहेत. येत्या दहा दिवसात रशिया युक्रेनवर नव्या हल्ल्यांसह मोठे आक्रमण करील, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ही माहिती लक्ष वेधून घेणारी ठरते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info