नेप्यितौ – म्यानमारची सत्ता हस्तगत केल्यानंतर या देशाच्या लष्कराने गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत २००हून अधिक निदर्शकांचा बळी घेतल्याची माहिती लोकशाहीवादी गटाने उघड केली. रविवारी एका दिवसात म्यानमारच्या लष्कराने ५० हून अधिक जणांचा बळी घेतला होता. त्यानंतरही कारवाई सुरूच असून गेल्या ४८ तासात सुमारे २० जण दगावल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई सुरू असतानाच म्यानमारमधील प्रमुख लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की यांना लक्ष्य करण्यात येत आहे. लष्कराने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवे आरोप ठेऊन कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
म्यानमारची राजधानी नेप्यितौसह यांगून व मंडालेसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकशाहीवादी आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळात शांततेत मोर्चे काढणार्या व लष्करी राजवटीविरोधात घोषणा देणार्या निदर्शकांनी लष्करी कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. लष्करी तुकड्यांना रोखण्यासाठी जागोजागी अडथळे निर्माण करण्यात येत असून प्रतिहल्ल्यांसाठी ‘स्लिंगशॉट’चाही वापर करण्यात येत आहे. लष्कराने उलथविलेल्या लोकशाहीवादी सरकारच्या नेत्यांनी निदर्शकांकडून देण्यात येणार्या प्रत्युत्तराचे समर्थन केले आहे.
लोकशाहीवादी निदर्शकांना सर्व थरांमधून मिळणारा पाठिंबाही वाढत असल्याचे समोर येत आहे. म्यानमारमधील प्रभावशाली धार्मिक संघटनेने लष्कराच्या कारवाईचा तीव्र निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्याचवेळी लष्करी कारवाईत बळी गेलेल्या निदर्शकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्यांनी परदेशी कंपन्यांना उघड पत्र लिहिले असून म्यानमारमधील गुंतवणूक व व्यवहार थांबविण्याचे आवाहन केले आहे. या कंपन्यांमध्ये म्यानमारच्या इंधनक्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
आग्नेय आशियाई देशांची संघटना असणार्या ‘आसियन’वरील दबावही वाढत चालल्याचे समोर येत आहे. ‘आसियन’चे सदस्य देश असणार्या काही देशांमधील माजी नेत्यांच्या एका गटाने संघटनेवर टीकास्त्र सोडून, म्यानमारबाबत अधिक आक्रमक व आग्रही भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड यासारख्या देशांमधील नेत्यांचा समावेश असणार्या या गटाने म्यानमारमधील लष्करी राजवटीला लक्ष्य करणारे ‘टार्गेटेड सँक्शन्स’ अर्थात निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
‘आसियन’च्या घटनेत सदस्य देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करु नये, अशी तरतूद असल्याने म्यानमारमधील लष्करी बंडानंतर ‘आसियन’ने सौम्य भूमिका घेतली आहे. मात्र म्यानमारमध्ये गेले दीड महिने सुरू असलेल्या क्रूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता या संघटनेवरील दबाव वाढू लागल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेनेही म्यानमारच्या मुद्यावर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. लष्कराकडून सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात पुरावे एकत्र करण्यात येत असून सर्व माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लोकशाहीवादी निदर्शकांवर गोळ्या झाडणार्या म्यानमारच्या लष्कराने देशातील प्रमुख नेत्या आँग सॅन स्यू की यांना लक्ष्य केले आहे. स्यू की यांनी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा दावा लष्कराकडून करण्यात आला असून त्यासाठी एका उद्योजकाचा कबुलीजबाब प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कबुलीच्या आधारावर स्यू की यांच्याविरोधात नवा खटला दाखल करण्याची तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |