मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका रशियाविरोधात मानसिक दबावतंत्राचे युद्ध खेळत आहे, असा आरोप रशियन संरक्षणमंत्र्यांचे सल्लागार आंद्रेई इलनित्स्की यांनी केला. मानवी संस्कृतीच्या आधारस्तंभांबद्दल असलेली शत्रूदेशाची समज व विचारसरणी पूर्णपणे उद्ध्वस्त करणे हे या युद्धाचे उद्दिष्ट असल्याचेही इलनित्स्की यांनी बजावले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व रशियन यंत्रणांना कमकुवत करण्याच्या कारवायाही सुरू असल्याचा दावा रशियन सल्लागारांनी यावेळी केला.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व प्रशासनाने रशियाविरोधात अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.रशिया अमेरिकेचा शत्रू आहे अशी घोषणा बायडेन प्रशासनाने केली होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची खुनी म्हणून संभावना केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक असलेल्या नॅव्हॅल्नी यांना झालेल्या अटकेवरून अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. बायडेन प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे युक्रेनने रशियाच्या विरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. युरोपमध्ये नाटो सक्रीय करून बायडेन प्रशासन पुन्हा एकदा रशियाला घेरण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर, रशियाच्या संरक्षण सल्लागारांनी केलेला आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘रशियाविरोधात नव्या प्रकारच्या युद्धतंत्राचा वापर करण्यात येत आहे. त्याला मेंटल वॉर असेही म्हणता येऊ शकते. मानवी संस्कृतीच्या आधारस्तंभांबद्दल असलेली शत्रूदेशाची समज व विचारसरणी पूर्णपणे उद्ध्वस्त करणे हे या युद्धाचे उद्दिष्ट आहे. रशियन जनतेच्या मानसिकतेला लक्ष्य करण्यात येत आहे’, या शब्दात सल्लागार आंद्रेई इलनित्स्की यांनी अमेरिकेवर आरोप केले. आर्थिक ताकद तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वापर करून अमेरिकेकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, प्रशासकिय यंत्रणा, लष्कर, रशियन चर्च व युवा वर्गाला कमकुवत करण्याच्या कारवाया सुरू असल्याचेही इलनित्स्की यांनी बजावले.
रशिया हा अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि या देशाविरोधात थेट लष्करी संघर्ष करणे शक्य नाही, या वास्तवाची जाणीव असल्याने अमेरिकेकडून अशा प्रकारच्या युद्धतंत्रांचा वापर होत असल्याचा दावा रशियन सल्लागारांनी केला. रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही, अमेरिकेच्या मानसिक दबावतंत्राच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. ‘रशियाला प्रत्येक क्षेत्रात रोखून त्याचे सामर्थ्य क्षीण करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. हे सातत्याने घडत आहे आणि उघड्या डोळ्यांनी पाहता येत आहे’, असे पेस्कोव्ह यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात पेस्कोव्ह यांनी, पुन्हा एकदा शीतयुद्धाची वेळ ओढवली तर रशिया त्यासाठी तयार असल्याचा दावा केला होता. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, आपले विध्वंसक हेतू साधण्यासाठी अमेरिका शीतयुद्धाच्या काळासारख्या लष्करी-राजकीय आघाड्या नव्याने उभ्या करीत असून, संयुक्त राष्ट्रसंघावर आधारलेली जागतिक व्यवस्था निकालात काढत आहे, असा आरोप केला होता.
English हिंदी
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |