बर्लिन – युरोपिय महासंघाकडून आखण्यात आलेला नवा ‘मायग्रेशन पॅक्ट’ भयानक असून त्यामुळे पुढील 15 वर्षात सुमारे सात कोटी आफ्रिकी निर्वासित युरोपात धडकू शकतात, असा इशारा युरोपियन संसदेतील जर्मन सदस्य गुनार बेक यांनी दिला आहे. गेल्याच महिन्यात आफ्रिकेतून घुसणार्या निर्वासितांना रोखण्यासाठी स्पेनने आपल्या सीमेवर लष्कर तैनात केल्याचे समोर आले होते. तर या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातच इटलीत 10 हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती नुकतीच सरकारकडून देण्यात आली आहे.
गेल्या दशकात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या नेतृत्त्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘ओपन डोअर पॉलिसी’मुळे युरोपात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणात घुसण्यास सुरुवात झाली होती. त्याविरोधातील असंतोषाची तीव्रता वाढू लागल्याने गेल्या दोन वर्षात घुसखोरी रोखण्यासाठी काही आक्रमक निर्णय घेतले होते. मात्र कोरोनाची साथ व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युरोपात पुन्हा एकदा निर्वासितांना दरवाजे खुले करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. युरोपिय महासंघाचा ‘पॅक्ट ऑन मायग्रेशन अॅण्ड असायलम’ त्याचाच भाग असल्याचा आरोप जर्मनीतील ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’चे (एएफडी) नेते व युरोपियन संसदेतील सदस्य गुनार बेक यांनी केला.