चीन ऑस्ट्रेलियाविरोधात ‘ग्रे झोन वॉर’ छेडण्याच्या तयारीत – तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

चीन ऑस्ट्रेलियाविरोधात ‘ग्रे झोन वॉर’ छेडण्याच्या तयारीत – तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

‘ग्रे झोन वॉर’

तैपेई/कॅनबेरा/बीजिंग – चीन ऑस्ट्रेलियाविरोधात ‘ग्रे झोन वॉर’ छेडण्याची तयारी करीत आहे, असा गंभीर इशारा तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. तैवान गेली काही वर्षे चीनच्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा सामना करीत असून लवकरच ऑस्ट्रेलियाविरोधातही याचा वापर सुरू होईल, असे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी बजावले. ऑस्ट्रेलियाला ‘ग्रे झोन वॉर’चा इशारा मिळण्याची गेल्या महिन्याभरातील ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन संरक्षणदलातील वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल अ‍ॅडम फिंडले यांनी, चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात ‘ग्रे झोन वॉरफेअर’ आधीच सुरू केल्याचे म्हंटले होते.

एखाद्या देशाने ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स’च्या अर्थात आपल्याशी उघडपणे संबंध नसलेल्यांच्या सहाय्याने प्रतिस्पर्धी देशावर दडपण येईल अशा रितीने सातत्याने कारवाया सुरू ठेवणे, याला ‘ग्रे झोन वॉरफेअर’ म्हटले जाते. ही पारंपारिक युद्धाला तोंड फुटेल असा हल्ला आणि शांती यामधील स्थिती असतेे. गेली काही वर्षे चीन तैवानच्या सागरी हद्दीत वारंवार मोठ्या प्रमाणात सशस्त्र मच्छिमारी जहाजे पाठवून ‘ग्रे झोन वॉर’चा अवलंब करीत होता.

‘ग्रे झोन वॉर’

तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी याचा उल्लेख करून पुढचे लक्ष्य ऑस्ट्रेलिया असेल, असा इशारा दिला. ‘‘‘चीनच्या नौदलाच्या आदेशांनुसार शेकडो सशस्त्र मच्छिमार बोटी सातत्याने तैवानच्या सागरी हद्दीत घुसखोरी करीत आहेत. चीनच्या या ‘ग्रे झोन ऑपरेशन्स’चा उद्देश शत्रू देशांना त्रास देणे व त्यांच्यावर दडपण आणणे हा आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत त्याचा अनुभव घेतलेला नाही. पण लवकरच चीनकडून त्याचा वापर सुरू होऊ शकतो’’, असे परराष्ट्रमंत्री वु यांनी बजावले. चीनच्या महत्त्वाकांक्षा फक्त साऊथ चायना सीपुरत्या मर्यादित नाहीत व चीनचा ‘नेव्हल मिलिशिआ’ ऑस्ट्रेलियाच्या हद्दीतही धडक मारेल , याकडे तैवानी मंत्र्यांनी लक्ष वेधले.

‘ग्रे झोन वॉर’

यावेळी वु यांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीने पॅसिफिक महासागरातील ‘सॉलोमन आयलंड्स’ या देशाबरोबर प्रस्थापित केलेल्या संबंधांचीही आठवण करून दिली. हा भाग ऑस्ट्रेलियापासून जवळ असून चीन ‘सॉलोमन आयलंड्स’चा वापर सामरिक हेतूंसाठी करु शकतो, असा दावाही तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. तैवान गेली अनेक वर्षे चीनच्या दडपशाहीचा मुकाबला करीत असून, आता जगातील लोकशाहीवादी देशांनी त्याविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही जोसेफ वु यांनी केले.

‘ग्रे झोन वॉर’

तैवानच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध चिघळल्याचे गेल्या काही महिन्यात समोर येत आहे. चीनकडून तैवाननजिक चाललेल्या हालचालींची ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली असून चीन-तैवान युद्धाची शक्यता वाढल्याचे संकेत नेत्यांकडून देण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी, चीन व तैवानमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बजावले होते.

गृह विभागाचे सचिव असणार्‍या मायकल पेझुलो यांनी, जवळच्या भागातून मोठ्या आवाजात युद्धाचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे, अशा शब्दात चीन-तैवान युद्धाची शक्यता वर्तविली होती. ऑस्ट्रेलियातील काही अधिकारी व नेत्यांनी तैवानच्या क्षेत्रात संघर्ष भडकल्यास ऑस्ट्रेलियाने अमेरिकी लष्कराला सहाय्य करावे, अशी भूमिकाही मांडली होती. ही बाब चीनला अस्वस्थ करणारी ठरली असून चिनी राजवट धमक्या तसेच इशारे देऊन दडपण आणण्याचे प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वीच तैवानच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाकडून करण्यात येणार्‍या हालचाली व वक्तव्ये बेजबाबदार तसेच चिथावण्या देणारी आहेत, असा इशारा चीनच्या लष्कराने दिला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर चीनच्या ‘ग्रे झोन वॉर’बद्दल तैवानी मंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info