इस्रायलने नवे हवाई हल्ले चढविल्याचा सिरियाचा आरोप

हवाई हल्ले

दमास्कस – इस्रायलने अलेप्पोमध्ये जोरदार हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन संरक्षण मंत्रालयाने केला. नफ्ताली बेनेट यांनी इस्रायलची सूत्रे हाती घेतल्यानंतर इस्रायलने सिरियात चढविलेला हा पहिला हल्ला असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला. तर चीनने सिरियासाठी आर्थिक सहाय्य जाहीर केल्यानंतर इस्रायलने हे हल्ले चढविल्याचा ठपका सिरियाने ठेवला आहे. इस्रायली लष्कराने सिरियाच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दोन दिवसांपूर्वी सिरियाच्या अलेप्पो प्रांतातील अल-सफिरा भागात हल्ले चढविले. चार एफ-16 विमानांनी एकूण आठ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा सिरियास्थित रशियन लष्कराने केला. सिरियन लष्कराने यापैकी सात क्षेपणास्त्रे भेदले, तर उर्वरित क्षेपणास्त्र अल-सफिरा येथील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसच्या ठिकाणावर कोसळले, अशी माहिती रशियन लष्कराने दिली. या हल्ल्यात अल-सफिरा येथील तळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/syria-accuses-israel-of-launching-new-airstrikes/