इंडो-पॅसिफिकमधील चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिका ‘नेव्हल टास्क फोर्स’ उभारणार

naval task

वॉशिंग्टन/बीजिंग – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचाली व महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी या क्षेत्रात कायमस्वरुपी ‘नेव्हल टास्क फोर्स’ उभारण्याचे संकेत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले आहेत. या टास्क फोर्सबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी एक ‘स्वतंत्र लष्करी मोहीम’(नेम्ड् मिलिटरी ऑपरेशन) आखण्याच्याही हालचाली सुरू झाल्याचा दावा संरक्षण विभागाशी निगडीत सूत्रांनी दिला. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, संरक्षणदलांना चीनच्या धोक्याचा मुकाबला करण्याबाबत निर्देश जारी केले होते. ‘नेव्हल टास्क फोर्स’ व ‘मिलिटरी ऑपरेशन’ याच निर्देशांचा भाग असल्याचे मानले जाते.

दोन दिवसांपूर्वीच ‘नाटो’ने प्रथमच चीनच्या धोक्याचा उघड उल्लेख असणारे निवेदन जारी केले होते. यात चीनच्या हालचाली व महत्त्वाकांक्षा जागतिक व्यवस्था कमकुवत करत असल्याचा इशारा देण्यात आला होता. नाटोच्या सदस्य देशांनी एकजुटीने चीनच्या आव्हानाचा मुकाबला करणे आवश्यक असल्याचेही नाटोच्या निवेदनात बजावण्यात आले होते. नाटोने घेतलेल्या या भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी संरक्षण विभागाकडून स्वतंत्र टास्क फोर्सचे मिळणारे संकेत महत्त्वाचे ठरतात.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल डिफेन्स पॉलिसी’मध्ये चीनच्या वाढत्या लष्करी धोक्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकी संरक्षणविभाग व गुप्तचर यंत्रणांनी सादर केलेल्या विविध अहवालांमध्येही चीनचा धोका कशा रितीने वाढत चालले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने यादृष्टीने संरक्षणखर्चात वाढ करून नौदल व हवाईदलासह आण्विक क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली होती. नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेनही चीनच्या बाबतीत आपले धोरण कठोर असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत असून नव्या योजना त्याचाच भाग ठरतात, असा सूत्रांचा दावा आहे.

नव्या योजना म्हणजे चीनला रोखण्यासाठी अखेरची गोळी अर्थात ‘सिल्व्हर बुलेट’ नसली तरी अमेरिकेचा संरक्षण विभाग पॅसिफिकला प्राधान्य देत आहे, हे संकेत महत्त्वाचे ठरतात अशी प्रतिक्रिया माजी संरक्षण अधिकारी एल्ब्रिज कोल्बी यांनी दिली. कोल्बी ट्रम्प प्रशासनात संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. एकाच वेळी ‘नेव्हल टास्क फोर्स’ व ‘मिलिटरी ऑपरेशन’साठी हालचाली सुरू करणे याचा अर्थ पॅसिफिकला प्राधान्य असणार्‍या अमेरिकेच्या संरक्षण क्षमतेमध्ये वाढ असा होतो, असा दावाही कोल्बी यांनी केला आहे.

इंडो-पॅसिफिकसाठी उभारण्यात येणारा कायमस्वरुपी ‘नेव्हल टास्क फोर्स’ हा शीतयुद्धाच्या काळात नाटोने तयार केलेल्या ‘स्टँडिंग नॅव्हल फोर्सेस अटलांटिक’च्या धर्तीवर असेल, असे संकेत संरक्षण विभागातील सूत्रांनी दिले आहेत. पॅसिफिकमधील या कायमस्वरुपी ‘नेव्हल टास्क फोर्स’मध्ये जपान व ऑस्ट्रेलियासह ब्रिटन व फ्रान्स या युरोपिय देशांचाही समावेश असू शकतो, असे विश्‍लेषक जेरी हेन्ड्रिक्स यांनी म्हटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info