अथेन्स/अंकारा – भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, जॉर्डन व सायप्रसने तुर्कीला नवा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा ठराव व आंतरराष्ट्रीय कायद्यांपलिकडे जाऊन तुर्कीने सायप्रसच्या प्रकरणात हस्तक्षेप करु नये, असे तिन्ही देशांनी बजावले आहे. तुर्कीने ‘नॉर्दर्न सायप्रस’मधील वादग्रस्त भाग पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला. तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी नुकतीच या भागाला भेटही दिल्याचे समोर आले आहे. तुर्कीच्या या कारवायांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ग्रीस, जॉर्डन व सायप्रसची बैठकही त्याचाच भाग मानला जातो.
गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगितला आहे. ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली तैनाती वाढविली होती.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/greece-jordan-cyprus-warn-turkey-over-mediterranean-tensions/