रशियाने युक्रेनला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची तयारी केली आहे

- संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूतांचा आरोप

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘युक्रेनला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे हेच रशियाचे ध्येय आहे. रशियाच्या या हेतूबाबत आता कुठल्याही स्वरुपाचा संशय राहिलेला नाही. रशिया आपण ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनच्या भागांमध्ये आपले अधिकारी नियुक्त करीत आहे. इतकेच नाही तर रशियाने या भागात बनावट सर्वामत चाचण्या घेऊन हा भाग रशियाला जोडण्याची तयारी केलेली आहे’, असे गंभीर आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी केला. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत बोलताना अमेरिकेच्या राजदूतांनी रशियाच्या बाजूने उभे राहणाऱ्या व विरोधात जाण्याचे नाकारणाऱ्या देशांवरही सडकून टीका केली.

जगाच्या नकाशावरून

पूर्व युक्रेनमधील डोम्बास व लुहान्स्क यांच्यासह दक्षिणेकडील खेरसन तसेच झापोरिशिया या प्रांतांमध्ये आपले अधिकारी नेमण्याच्या हालचाली रशियाने सुरू केल्या आहेत. हा भूभाग आपल्या देशाला जोडण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू झाले असून रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच हेच आपल्या देशाचे उद्दिष्ट असल्याचा उघडपणे दावा केला होता, याकडे अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी लक्ष वेधले. इजिप्तमध्ये पार पडलेल्या बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या जनतेला तिथल्या बेकायदेशीर सरकारच्या तावडीतून मुक्त करणे हे रशियाचे ध्येय, असल्याचे म्हणाले होते. त्याचा दाखला अमेरिकेच्या राजदूतांनी दिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच रशिया पूर्व युक्रेनमध्ये जनतेवर अत्याचार करीत असून निष्पाप नागरिकांचे मुडदे पाडत असल्याचा ठपका ठेवला. मानवी सहाय्य पुरविणारे कार्यकर्ते व पत्रकारांना रशियन सैन्य ठार करीत आहे. तसेच इथून पळ काढणाऱ्या जनतेवरही रशियन सैन्याकडून हल्ले चढविले जातात, अशी आरोपांची फैर राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी झाडली. तर रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघातील उपराजदूत दिमित्री पोलियान्स्की यांनी युक्रेनला नाझीवादापासून मुक्त करण्याची व नि:शस्त्रीकरणाची प्रक्रिया यापुढेही सुरू राहिल, असे ठासून सांगितले. तसेच पाश्चिमात्य देश युक्रेनच्या लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाठवून, रशियाची युक्रेनवरील कारवाई योग्यच असल्याचे दाखवून देत आहेत, अशी टीका पोलियान्स्की यांनी केली.

जगाच्या नकाशावरून

दरम्यान, युक्रेनमधील युद्धात रशियाने आत्तापर्यंत 40 हजाराहून अधिक सैनिक गमावले असून युक्रेनी लष्कराने गेल्या 24 तासात चढविलेल्या हल्ल्यात 170 रशियन सैनिक ठार झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. युक्रेनच्या प्रतिकाराबाबत याआधीही अशा स्वरुपाचे दावे समोर आले हेोते. मात्र रशियन सैन्याकडून दिली जाणारी माहिती याहून खूपच वेगळी आहे.

रशियन सैन्याचा धडाका लक्षात घेता युक्रेनला आपला रशियाच्या ताब्यातील भूभाग परत मिळविण्यासाठी फारच कमी अवधी शिल्लक असल्याची जाणीव अमेरिकेने नुकतीच करून दिली होती. त्यातच अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतानी रशिया युक्रेनला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याच्या तयारीत असल्याचे आरोप केले आहेत. हे सारे लक्षातघेतले तर, पूर्व युक्रेनच्या आपल्या ताब्यातील भूभागाबाबत रशिया लवकरच एखादा निर्णय घोषित करण्याची दाट शक्यता असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info