पुढची दहा वर्षे दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वाधिक धोकादायक काळ ठरेल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा दावा

धोकादायक

मॉस्को/किव्ह – जग ऐतिहासिक वळणावर उभे असून येणारे दशक दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात धोकादायक, अनिश्चित व तितकेच महत्त्वाचे दशक ठरेल, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. यावेळी पुतिन यांनी, बहुस्तंभीय जग हे वास्तव असून युरोपला आपली राजकीय व आर्थिक क्षमता पुन्हा मिळवायची असेल तर याकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्लाही दिला. युक्रेनमधील मोहीम योग्य दिशेनेच चालली असून रशियाला या संघर्षात अण्वस्त्र वापरण्याची गरज वाटत नसल्याचेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. बुधवारी रशियात पुतिन यांच्या देखरेखीखाली रशियात ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी केलेले हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

धोकादायक

रशियात आयोजित करण्यात आलेल्या ‘वाल्दई डिस्कशन क्लब’च्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांच्या धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले. अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील उदारमतवादी गटाकडे जगाला देण्यासारखे नवे काहीच राहिले नसून त्यांना फक्त एकतर्फी वर्चस्व हवे आहे, अशा शब्दात पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले. अमेरिकेसह पाश्चिमात्य जगताला ते कधीच चुकत नाहीत, असा भ्रम निर्माण झाला असून ही बाब अत्यंत घातक असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले. रशिया हा पाश्चिमात्यांचा शत्रू नसून त्याने यापूर्वी त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न केले होते, मात्र ते नाकारण्यात आले, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी केला. रशियाच्या युक्रेनमधील मोहिमेबाबत बोलताना, त्यांनी या मोहिमेचे उद्दिष्ट डोन्बासमधील जनतेची सुरक्षा हेच होते व त्यापासून रशियाने माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले. युक्रेनमधील संघर्षाची सध्याची स्थिती बघता युक्रेनमध्ये अण्वस्त्रे वापरण्याची गरज वाटत नाही. यासंदर्भात रशियाकडून करण्यात आलेली वक्तव्ये हे पाश्चिमात्यांच्या दाव्यांना दिलेला प्रतिसाद होता, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले. रशियाच्या वक्तव्यांवरून ओरड करणाऱ्या देशांनी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुस यांनी अण्वस्त्रांबाबत केलेल्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केले, असा ठपकाही त्यांनी ठेवला.

धोकादायक

पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अणुहल्ल्याचा उल्लेख करून आपली धमकी पोकळ समजू नका असे बजावले होते. पुतिन यांच्या या वक्तव्यानंतर रशिया युक्रेनवर अणुहल्ला करणार असल्याचे दावे पाश्चिमात्यांकडून करण्यात येत होते. यावरून अमेरिका व नाटोने रशियाला गंभीर परिणामांचे इशारेही दिले होते. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे वापरणार नसल्याचे वक्तव्य करणे महत्त्वाचे मानले जाते.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्य देश युक्रेनचा वापर करून अतिशय धोकादायक व घाणेरडा खेळ खेळत असल्याचा आरोपही केला. मात्र हा खेळ यशस्वी होणार नसून अमेरिकेहित पाश्चिमात्य आघाडीला रशियाशी चर्चा करावीच लागेल, याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info