रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अणुयुद्धाच्या धोक्यावरून नवा इशारा

मॉस्को/किव्ह – अणुयुद्धाचा धोका सातत्याने वाढतो आहे. हा वाढता धोका नाकारणे चुकीचे ठरेल’, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. त्याचवेळी रशिया पहिला अणुहल्ला करणार नाही, जर रशियाच्या भूमीवर हल्ला झाला तरच रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल, अशी ग्वाहीदेखील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली. युक्रेनमध्ये सुरू असणारी मोहीम अपेक्षेपेक्षा अधिक लांबली आहे, मात्र रशिया आपली उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवेल असेही पुतिन यांनी यावेळी बजावले. पुतिन अण्वस्त्रांच्या धोक्याबाबत इशारा देत असतानाच रशिया व अमेरिकेदरम्यान ‘हाय प्रोफाईल’ कैद्यांची अदलाबदल पार पडल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष

रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या न्यूक्लिअर फोर्सेसना ॲलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नव्या अण्वस्त्राची चाचणी तसेच आण्विक सराव आयोजित करून रशियाची आण्विक सज्जताही दाखवून दिली होती. रशिया अण्वस्त्रांच्या बाबतीत करीत असलेली वक्तव्ये पोकळ नसल्याचा इशाराही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला होता. काही महिन्यांपूर्वी रशियात झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत युक्रेनविरोधात ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा वापर करण्यात यावा, अशी मागणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर रशियाच्या काही नेत्यांकडूनही अणुहल्ल्याबाबत वक्तव्ये करण्यात आली होती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष

या पार्श्वभूमीवर, बुधवारी झालेल्या एका बैठकीत पुतिन यांनी अणुयुद्धाच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘रशिया कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर पहिल्यांदा करणार नाही. रशिया अण्वस्त्रसज्ज असला तरी त्याचा वापर दुसऱ्यांना धमकावण्यासाठी केला जाणार नाही. रशिया मूर्ख नाही, अण्वस्त्रे काय आहेत याची आम्हाला नीट जाणीव आहे. रशिया आपली अण्वस्त्रे जगभरात प्रदर्शित करीत फिरणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. रशियाकडे जगातील प्रगत व अत्याधुनिक अण्वस्त्रे आहेत, पण आम्ही ती अमेरिकेप्रमाणे जगभरात तैनात करीत नाही, याकडेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.

अण्वस्त्रांच्या धोक्याबाबत इशारा देणाऱ्या पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी मोहीम अधिक काळ लांबण्याचे संकेतही दिले. ‘युक्रेनमधील मोहीमेची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी अधिक काळ लागेल, त्यामुळे सध्या सुरू असणारा संघर्ष लांबू शकतो. मात्र या काळात रशियाने मिळविलेले यशही लक्षणीय आहे. खेर्सन व झॅपोरिझिआसारखे प्रांत रशियाला जोडले गेले आहेत. अझॉव्ह समुद्र रशियाचा अंतर्गत भाग झाला आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. रशियन लष्कर हळुहळू पण योग्य मार्गाने पुढे जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष

दरम्यान, गेले काही दिवस रशियातील तळांवर हल्ले करण्यात यशस्वी झालेल्या युक्रेनचा क्रिमिआवरील नवा हल्ला उधळल्याची माहिती रशियाने दिली आहे. क्रिमिआच्या सेव्हॅस्टोपोल तळावर गुरुवारी सकाळी युक्रेनी ड्रोन्सनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र रशियन युद्धनौकेने ड्रोन्स पाडल्याचे क्रिमिआतील सूत्रांकडून सांगण्यात आले. क्रिमिआतील तळाबरोबरच बेलेगोरोद भागातही युक्रेनकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे रशियन माध्यमांनी म्हटले आहे.

जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, २०१४ साली पार पडलेला मिन्स्क करार युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याच्या योजनेचा भाग असल्याची कबुली दिली आहे. मर्केल यांच्या या वक्तव्यावर रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून यातून युरोपचे दुटप्पी धोरण दिसून येते, अशी टीका रशियन प्रवक्त्यांनी केली. दरम्यान, रशिया व अमेरिकेदरम्यान ‘हाय प्रोफाईल’ कैद्यांची अदलाबदल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेने त्यांच्या ताब्यातील शस्त्रास्त्र व्यापारी व्हिक्टर बाऊटची सुटका केली असून तो रशियात दाखल झाल्याचे रशियन माध्यमांनी सांगितले. तर रशियाने अमेरिकी खेळाडू ब्रिटनी ग्रिनर हिची सुटका केली असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info