Breaking News

सिरिया – तिसर्‍या महायुद्धाची सुरूवात

दमास्कस – सिरियातील संघर्ष सुरू होऊन सात वर्षे उलटली आहेत. या सात वर्षाच्या काळात सिरियातील गृहयुद्धात बळी पडलेल्यांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली आहे. तर यामुळे बेघर झालेल्यांची संख्या एक कोटीच्याही पुढे आहे. खरोखरच हे सिरियन सरकार आणि बंडखोर यांच्यातील गृहयुद्ध असते, तर त्याचे परिणाम इतके भीषण असू शकले नसते.

सिरियातील या युद्धात राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची राजवट वाचविण्यासाठी इराण आणि रशिया हे प्रबळ देश पुढे सरसावले असून त्यांचे सैन्य सिरियात अस्साद यांच्या बाजूने लढत आहे. त्याचवेळी सिरियन बंडखोरांच्या बाजूने अमेरिका व सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बाहरिन हे देश खडे ठाकले आहेत. सिरियात धुमाकूळ घालणार्‍या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेबरोबर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांनीही पुढाकार घेतला होता. त्यामुळे सिरियातील युद्ध हा जगातील प्रमुख देशांमध्ये पेटलेला सत्तासंघर्ष ठरतो. हा तिसर्‍या महायुद्धाचा आरंभच आहे, याची खात्री पटते.

२०११ सालापासून सिरियन राजवट आणि बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू झाला. तेव्हापासून ते आत्ता सिरियाची राजधानी दमास्कसजवळील ईस्टर्न घौतापर्यंत आलेल्या युद्धाने अनेक टप्पे आणि वळणे घेतली. आखाती देशांमध्ये लोकशाहीची मागणी करणार्‍या ‘जस्मिन रिव्होल्युशन’ने सिरियात मात्र सुरूवातीपासूनच रक्तपात सुरू केला होता. या रक्तपाताचे खापर सिरियन राजवट बंडखोर आणि त्यांच्या पाश्चिमात्य पाठीराख्या देशांवर फोडत होते. तर बंडखोरांकडून या हिंसाचाराला सिरियन लष्कराचे अत्याचारच जबाबदार असल्याचे कारण दिले जात होते.

लवकरच सिरियातील राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची राजवट उलथेल आणि हा संघर्ष संपेल, असा दावा काहीजणांनी केला होता. अमेरिका व मित्रदेशांच्या सहाय्याने सिरियन बंडखोरांनी सुरुवातीला मारलेली धडक पाहता, लवकरच ते अस्साद यांना सत्तेवरून खाली खेचतील असे वाटू लागले होते. पण अस्साद यांच्या राजवटीच्या बाजूने इराणने सिरियातील युद्धात उडी घेतली. इराणी लष्कराचे पथक आणि इराणचा भक्कम पाठिंबा असलेले हिजबुल्लाहचे दहशतवादी या युद्धात अस्साद यांच्यासाठी लढू लागले.

यानंतर सिरियन बंडखोरांना कडवा प्रतिकार होऊ लागला. सिरियन लष्कर आणि बंडखोर यांच्यातील संघर्षाचा लाभ घेऊन काही वर्षातच ‘आयएस’ किंवा ‘आयएसआयएस’ या नावाने ओळखली जाणारी क्रूर दहशतवादी संघटना देखील सिरियात हातपाय पसरू लागली. ही संघटना अस्साद यांच्या लष्कराविरोधात लढत असल्याने सिरियन बंडखोरदेखील या संघटनेचा वापर करण्याच्या तयारीत होते. पण अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी मात्र ‘आयएस’चा धसका घेतला. सिरिया ‘आयएस’च्या हाती पडेल, या भीतीने अमेरिकेने या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले सुरू केले. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने त्याला साथ दिली. तर रशियानेही ‘आयएस’वर हवाई हल्ले चढविल्याचे दावे केले.

अमेरिका व मित्रदेश सिरियात ‘आयएस’च्या ठिकाणांवर नाही, तर सिरियन लष्करावर हल्ले चढवीत असल्याचा आरोप सिरियन राजवट, इराण व रशियाकडून केला जाऊ लागला. हे आरोप फेटाळून अमेरिका व मित्रदेश सिरियन राजवट आणि ‘आयएस’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून त्यांचा नायनाट करण्याची घोषणा करू लागले. सिरियातील या युद्धाला केवळ हाच एक पैलू नव्हता. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बाहरिन, कतार व तुर्की हे देशदेखील अस्साद यांना सिरियाच्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करीत होते.

पण आता यातल्या काही देशांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. सुरुवातीच्या काळात सिरियन राजवट व इराण आणि रशियाच्या विरोधात उघड भूमिका घेणारा तुर्की सध्या सिरियातील कुर्दवंशिय संघटनांवर हल्ले चढवीत आहे. ही संघटना कुर्दांचा स्वतंत्र देश स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असून तुर्कीच्या कुर्दबहुल भागावर या संघटनेचा डोळा असल्याची भीती तुर्कीला वाटत आहे. तर सौदीप्रणित अरब देशाच्या आघाडीतून कतार बाहेर पडला असून इराण व तुर्की आता कतारला सहाय्य करीत आहेत.

या सार्‍या घडामोडींमुळे सिरियात एकाच वेळी सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद व बंडखोर संघटनांमधली धुमश्चक्री, इराण व सौदी अरेबियाचा वर्चस्वासाठीचा संघर्ष, त्याचवेळी अमेरिका व मित्रदेशांबरोबर रशियाची सत्तास्पर्धा असे अनेक पैलू दिसत आहेत. याबरोबरच हिजबुल्लाह, ‘आयएस’सारख्या खतरनाक दहशतवादी संघटना सिरियातील रक्तपाताची भयावहता अनेक पटींनी वाढवीत आहेत. या कारणांमुळे जग, सिरियाकडे तिसर्‍या महायुद्धाची पहिली उघड रणभूमी म्हणून पाहू लागले असून या रणभूमीची व्याप्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आहे. इथली आग सिरियाच्या शेजारी देशांनाही भस्मसात करू शकते, अशी कबुली शेजारी देशांकडून दिली जात आहे. म्हणूनच सिरिया हा देश तिसर्‍या महायुद्धाचे आरंभस्थान ठरला आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)