Breaking News

सौदीचे राजे सलमान यांच्या राजवाड्याजवळ आलेले ड्रोन पाडले

रियाध – सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्या राजवाड्यानजिक येऊन ठेपलेले ड्रोन सौदीच्या जवानांनी पाडले. सौदीच्या प्रमाणवेळेनुसार रात्री ५० मिनिटांनी घडलेल्या या घटनेने जगभरात खळबळ माजविली होती. प्रमुख वृत्तसंस्थांनी हा सौदीच्या राजवाड्यावरील हल्ला असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र रविवारी सौदीच्या यंत्रणांनी याबाबतचा खुलासा देऊन ही घटना गैरसमजातून घडल्याची माहिती दिली. तसेच या ड्रोनमुळे सौदीचे राजे सलमान यांना कुठल्याही स्वरुपाचा धोका निर्माण झाला नव्हता, यावेळी ते राजवाड्यात नव्हते, अशी माहितीही सौदीच्या यंत्रणांनी दिली आहे.

हे ड्रोन अनधिकृत होते आणि जवानांनी गोळीबार करून ड्रोन पाडल्याची माहिती सौदीची राजधानी रियाधच्या पोलीस अधिकार्‍यांनी दिली. यावेळी सौदीचे राजे सलमान राजवाड्यात नव्हते तर ते दिरिया येथील आपल्या फार्म हाऊसवर होते, असा खुलासा या पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. मात्र या ड्रोनबाबतची अधिक माहिती देण्यास सौदीच्या यंत्रणा टाळाटाळ करीत असल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे राजे सलमान यांच्या राजवाड्याच्या परिसरात झालेल्या गोळीबाराची चित्रफित प्रसारित करून जगभरातील प्रमुख वृत्तसंस्थांनी शनिवारी रात्री या ठिकाणी हल्ला झाल्याचे वृत्त दिले होते.

तसेच राजे सलमान यांना सुरक्षेसाठी दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात आल्याची माहितीही वृत्तसंस्थांनी दिली होती. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही, असेही या वृत्तसंस्थांनी म्हटले होते. सौदीच्या यंत्रणांनी या प्रकरणी खुलासा दिल्यानंतर, आधी दिलेल्या बातम्यांची चर्चा होत नसली तरी याबाबतचे गूढ वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात सौदीच्या जेद्दाह शहरातील राजवाड्यावर ‘मनसूर अल-आम्री’ नावाच्या इसमाने हल्ला चढविला होता. या हल्लेखोराला सौदीच्या जवानांनी ठार केले पण त्याआधी त्याने दोन जवान ठार तर दोन जणांना जखमी केले होते.

यामुळे सौदीचे राजे सलमान व क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. शनिवारी रियाध येथील राजे सलमान यांच्या राजवाड्यापर्यंत धडक मारणार्‍या ड्रोनची बातमी देत असताना, वृत्तसंस्था जेद्दाह येथे झालेल्या या हल्ल्याचाही दाखला देत आहेत. इतकेच नाही तर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीमध्ये हाती घेतलेल्या क्रांतिकारी सुधारणांच्या कार्यक्रमावर या देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता या निमित्ताने नव्याने वर्तविली जात आहे.

राजे सलमान व क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी सौदीमध्ये महिलांच्या वावरावरील निर्बंध मागे घेऊन त्यांना ड्रायव्हिंगचे परवाने देण्याची घोषणा केली. तसेच स्पोर्टस् स्टेडियमध्येही यापुढे महिलांना प्रवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. सौदीत सिनेगृहे सुरू झाली असून हे सारे या देशासाठी फार मोठे बदल असून सौदीतील कट्टरपंथीय हे बदल स्वीकारणार नाही, अशी दाट शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमे वर्तवित आहेत. या सामाजिक सुधारणांच्याही आधी सौदीमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाई हाती घेऊन सौदीच्या राजपुत्रांचे व वरिष्ठ अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या मालमत्तेच्या ७० टक्के इतकी संपत्ती राजकोषात जमा करण्याच्या मोबदल्यात यातील काही राजपुत्र व वरिष्ठ अधिकार्‍यांची सुटका करण्यात आली होती.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी स्वीकारलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सौदीतील सत्तेचा समतोल ढासळला असून यानंतर सौदीत फार मोठ्या उलथापालथी होऊ शकतात, असे दावे विश्‍लेषकांकडून केले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी आलेल्या बातम्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info/posts/386155271792963