अणुयुद्धाचा सामना करण्यासाठी अमेरिकेची आपत्कालीन योजना तयार

अणुयुद्धाचा सामना करण्यासाठी अमेरिकेची आपत्कालीन योजना तयार

वॉशिंग्टन – रशिया आणि अमेरिकेदरम्यान अणुयुद्ध भडकण्याचे इशारे दिले जात असतानाच, अमेरिकेने अणुयुद्धाला तोंड देण्यासाठी आपत्कालीेन योजना तयार केली आहे. ब्रिटनच्या एका दैनिकाने यासंदर्भात दिलेल्या बातमीत राजधानी वॉशिंग्टनसह न्यूयॉर्क व लॉस एंजेलिस ही प्रमुख शहरे अमेरिकेवर होणार्‍या अणुहल्ल्याचे लक्ष्य असतील, असा खळबळजनक दावा केला आहे.

अशा अणुहल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ने अणुयुद्धाबाबतची आपत्कालिन योजना तयार केली आहे. या योजनेला ‘नॅशनल रिस्पॉन्स सिनॅरिओ नंबर वन’ असे नाव देण्यात आले आहे. या आपत्कालीन योजनेत अणुहल्ला झाल्यास अमेरिकी शहरांमध्ये तत्काळ लष्कर तैनात करण्यात येईल. हे जवान आण्विक हल्ल्यानंतर जवळपास तीन हजार चौरस मैलांचा भाग रिकामा करतील. यामुळे अणुहल्ल्याची झळ कमी होऊ शकते.

अमेरिकी शहरांवर अणुहल्ला झाल्यास १० हजार टन ‘टीएनटी’ स्फोटकांची क्षमता असलेल्या अणुबॉम्बचा वापर होऊ शकतो, ही शक्यता गृहित धरून ही आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. अमेरिकेतील प्रमुख शहरात दहशतवाद्यांकडूनही अणुबॉम्बचा स्फोट घडविण्यात येईल, अशा स्वरुपाची शक्यताही आपत्कालीन योजनेत व्यक्त करण्यात आली आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये असा हल्ला झाल्यास लाखो जण मृत्यूमुखी पडतील, असा दावा आपत्कालीन योजनेत करण्यात आल्याचे वृत्तात म्हंटले आहे.

अमेरिकेवर अणुहल्ला झाल्यास ६४ फूट खोल व १५० फूट व्यासाचा खड्डा पडेल तसेच किरणोत्सर्गामुळे होणारी विषबाधा, आंधळेपणा यासह अनेक रोगांना तोंड द्यावे लागेल, असे ‘नॅशनल रिस्पॉन्स सिनॅरिओ नंबर वन’मध्ये नमूद करण्यात आले आहे. अणुहल्ल्यानंतर पुन्हा अमेरिकी शहरांची उभारणी करण्यास अनेक वर्षे व अब्जावधी डॉलर्सचा निधी लागेल आणि अर्थव्यवस्थेला भयंकर मंदीचा सामना करावा लागेल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसिज् कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन’ने (सीडीसी) अणुयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घ्यायची दक्षता व तयारी याबाबत मार्गदर्शन करणार्‍या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इतर घटनांमध्ये देण्यात येणार्‍या आपत्कालीन प्रतिसादापेक्षा अणुहल्ल्याला देण्यात येणार्‍या प्रतिसादाबाबतचे नियोजन व तयारी अतिशय वेगळी असते, याची जाणीव जनतेला या कार्यक्रमातून करून देण्यात आली होती.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/993916667607560192
https://www.facebook.com/WW3Info