Breaking News

इस्रायली पंतप्रधानांच्या दौर्‍या नंतर रशियाने सिरियाला ‘एस-३००’ पुरविण्याचा निर्णय रोखला

मॉस्को – सिरियाला ‘एस-३००’ ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याची प्रतिक्रिया रशियन राष्ट्राध्यक्षांचे लष्करी सहाय्यक ‘व्लादिमिर कोझिन’ यांनी दिली. रशियन दैनिकाशी बोलताना कोझिन यांनी सिरियाला ‘एस-३००’ पुरविण्याचा निर्णय स्थगित केल्याचे स्पष्ट केले. इस्रायली पंतप्रधानांच्या रशिया दौर्‍यानंतर रशियाने घेतलेला हा निर्णय सिरिया तसेच इराणला हादरा देणारा ठरतो.

रशिया आणि सिरियामध्ये ‘एस-३००’च्या खरेदीविषयी व्यवहार झाले होते. येत्या काही महिन्यात ही हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियातील अस्साद राजवटीला पुरविण्यात येईल, असे संकेतही रशियन नेत्यांनी दिले होते. पण रशियाची ही हवाई यंत्रणा इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे इस्रयालचे म्हणणे होते.

बुधवारी रशियाच्या दौर्‍यावर गेलेल्या पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर झालेल्या भेटीतही ही भूमिका मांडली.

इस्रायली पंतप्रधानांबरोबर झालेल्या या भेटीबाबत रशियन सरकारने सविस्तर तपशील जाहीर केले नव्हते. पण नेत्यान्याहू आणि पुतिन यांच्यातील या भेटीला काही तास उलटत नाही तोच रशियाने ‘एस-३००’ यंत्रणा सिरियाला पुरविण्याबाबत किंवा त्यांच्या व्यवहाराबाबत रशियाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पुतिन यांचे सहाय्यक कोझिन यांनी स्पष्ट केले. सिरियातील अस्साद राजवटीकडे रशियाने याआधी पुरविलेल्या यंत्रणा असून नव्या हवाई सुरक्षा यंत्रणेची तूर्तास आवश्यकता नसल्याचे कोझिन यांनी सांगितले. रशियाच्या या निर्णयामुळे सिरियातील अस्साद राजवटीला धक्का बसला आहे.

नेत्यान्याहू यांच्या रशिया दौर्‍यात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

– रशियन परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

दोन दिवसांपूर्वी रशियन राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित केलेल्या ‘व्हिक्टरी डे’च्या संचलनात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट उधळून लावल्याची माहिती रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ‘ओलेग सिरोमोलोतेव्ह’ यांनी दिली. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने यासंबंधी सुमारे २० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या ‘परेड’मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू उपस्थित होते. त्यामुळे भयंकर कट उधळल्याचा दावा रशियन आणि इस्रायली माध्यमे करीत आहेत.

दुसर्‍या महायुद्धामध्ये सोव्हिएत रशियाच्या ‘रेड आर्मी’ने नाझी जर्मनीच्या सैनिकांवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून रशियामध्ये ९ मे रोजी ‘व्हिक्टरी डे’ साजरा केला जातो. या निमित्ताने भव्य लष्करी संचलनांचे आयोजन केले जाते. तसेच रशियाच्या मित्रदेशांच्या नेत्यांना या लष्करी संचलनासाठी आमंत्रित केले जाते. यावेळी रशियाने इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांना यासाठी आमंत्रित केले होते.

या कार्यक्रमात मोठा घातपात घडविण्याचा भयंकर कट दहशतवाद्यांनी आखली होती. पण वेळीच कारवाई करून मोठा कट उधळल्याचा दावा रशियन यंत्रणा करीत आहेत. मात्र या कटाचे तपशील रशियान यंत्रणांनी उघड केलेले नाहीत.

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/995391163526930432
https://www.facebook.com/WW3Info/posts/393171004424723