इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले

इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले

विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांची टीका

अणुकरारपॅरिस – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटलांटिक महासागराच्या पलीकडच्या देशांबरोबरील घनिष्ठ संबंध संपवून टाकले आहेत. याचा भयंकर फटका युरोपिय देशांना बसला असून यापुढे युरोपिय देश सहकार्य व सुरक्षेसाठी अमेरिकेवर विसंबून राहू शकत नाहीत. युरोप सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहे’, असा दावा विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांनी केला. त्याचवेळी युरोपच्या या समस्या सोडविण्याची योजना आपल्याकडे असल्याचा दावाही सोरस यांनी केला आहे.

युरोपात शिरलेल्या निर्वासितांचे समर्थन करणारे जॉर्ज सोरस हे धनाढ्य गुंतवणूकदार गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. विशेषतः हंगेरी व इतर काही युरोपिय देशांमध्ये सोरस यांच्या विरोधात वातावरण गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणाचे टीकाकार अशीही सोरस यांची ओळख आहे. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या विख्यात अभ्यासगटासमोर बोलताना जॉर्ज सोरस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर सडकून टीका केली.

ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने इराणबरोबरील अणुकराराच्या बाजूने भूमिका घेतलेली असताना, ट्रम्प यांनी एकांगी निर्णय घेऊन अमेरिकेला या अणुकरारातून बाहेर काढले. या निर्णयामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेचे युरोपिय देशांबरोबरील घनिष्ठ संबंध तोडून टाकले आहेत. तसेच नाटोच्या सदस्यदेशांनी आपल्या सुरक्षेसाठी अधिक खर्च करावा, असे बजावून ट्रम्प यांनी या संबंधांवर आणखी एक आघात केला. दुसर्‍या महायुद्धानंतर, शीतयुद्धाच्या काळातही अमेरिकेने युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण अमेरिकेचे हे धोरण बदलून ट्रम्प यांनी यापुढे युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे स्त्रोत व निधी उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

हा फार मोठा धक्का असून यापुढे युरोपिय देश आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहू शकत नाहीत, असे सोरस म्हणाले. त्याचवेळी युरोप आपल्या अस्तित्वासाठी लढत असल्याचे कठोर वास्तव मान्य केले पाहिजे, असा दावा सोरस यांनी केला. निर्वासितांची समस्या, महासंघातून बाहेर पडू पाहणार्‍या देशांच्या समस्या आणि आर्थिक प्रश्‍न, यामुळे युरोपिय महासंघ खिळखिळा बनला आहे, याकडे सोरस यांनी लक्ष वेधले. तसेच हंगेरी, इटली आणि पोलंड हे देश युरोपिय महासंघाच्या भवितव्याकडे संशयाने पाहत आहेत, हीदेखील फार मोठी समस्या ठरते, असे सांगून सोरस यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

निर्वासितांची समस्या हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन सारख्या नेत्यांनी अतिरंजित करून दाखविली आहे. यामुळे वातावण बिघडले असून यातून बाहेर पडण्यासाठी युरोपिय महासंघाने ठोस उपाययोजना करायला हव्या. यासाठी महासंघाने एकजुटीने मिळणार्‍या आर्थिक व सुरक्षाविषयक लाभाकडे सदस्यदेशांचे लक्ष केंद्रित करावे. तसे झाले तर या लाभांसाठी इतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सदस्यदेश महासंघात राहतील, असा विश्‍वास सोरस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महासंघाने एकाच चलनाचा वापर करण्याची सक्ती सोडून द्यावी, असा सल्लाही सोरस यांनी दिला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1002530323069063168
https://www.facebook.com/WW3Info/posts/400117613730062