Breaking News

इस्रायलच्या विनाशासाठी सिरियात ‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ सज्ज – इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची घोषणा

तेहरान – ‘‘सिरियाच्या गोलान सीमारेषेवरील भागात ‘इस्लामी आर्मी’ इस्रायलच्या विनाशासाठी सज्ज झाली असून यासाठी केवळ आदेशाची प्रतीक्षा करीत आहे’’, अशी घोषणा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चे उपप्रमुख जनरल हुसैन सलामी यांनी केली. त्याचवेळी लेबेनॉनमधल्या हिजबुल्लाहने इस्रायलच्या दिशेने एक लाख क्षेपणास्त्रे रोखून धरलेली आहेत, असेही जनरल सलामी यांनी जाहीर केले. त्यांनी केलेल्या या घोषणांमुळे इस्रायलच्या विरोधात झालेल्या जय्यत तयारीची माहिती जगजाहीर झाली असून नजिकच्या काळात याचे फार भीषण पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’, सज्ज, जनरल सलामी, हिजबुल्लाह, विनाश, इस्रायल, सिरिया, रशियाजून महिन्यात इराणमध्ये ‘कुद्स डे’चा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना जनरल सलामी यांनी अत्यंत जहाल व महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ‘आधीच्या काळात पाहिला नव्हता इतका भयंकर धोका आत्ताच्या काळात इस्रायलसमोर खडा ठकला आहे’, असे सांगून जनरल सलामी यांनी इस्रायलच्या विनाशाची सारी तयारी झाल्याचे दावे केले. ‘‘‘इंटरनॅशनल इस्लामिक आर्मी’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कराची’ स्थापना सिरियामध्ये झाली आहे. या लष्कराच्या गर्जना सिरियाच्या गोलान सीमारेषेवर दुमदुमत आहेत. हे आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कर इस्रायलच्या विनाशासाठी पूर्णपणे सज्ज असून त्यासाठी केवळ एका आदेशाची प्रतीक्षा करीत आहे’’, असा दावा यावेळी जनरल सलामी यांनी केला.

‘इस्रायलची राजवट कायमची जमीनदोस्त करण्याची वेळ अगदी जवळ आली आहे’, असे सांगून जनरल सलामी यांनी यातच सर्वांचे भले असेल, असे म्हटले आहे. इस्रायलच्या धर्मांध राजवटीपासून सार्‍या जगाला धोका संभवतो, असा शेराही यावेळी जनरल सलामी यांनी मारला. त्याचवेळी इराणचे माजी सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह खोमेनी यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी इस्रायलचा विनाश करणे का आवश्यक आहे, ते जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासूनच इस्रायलच्या राजवटीने इराणचा धसका घेतलेला आहे, अशी जहाल विधाने जनरल सलामी यांनी यावेळी केली.

दरम्यान, सिरियाच्या गोलान सीमेजवळ सध्या सिरियन लष्कर व रशियाचे जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत. या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य सिरियन बंडखोरांची ठिकाणे असल्याचे सांगितले जाते. मात्र इस्रायलने आपल्या गोलान सीमाभागाजवळील सिरियाच्या हालचाली खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा दिला होता. तसेच या गोलान सीमाभागात इस्रायलने आपल्या लष्करी हालचाली सुरू करून सिरिया व रशियालाही योग्य तो संदेश दिला होता. त्याचवेळी या क्षेत्रात इराणसमर्थक हिजबुल्लाहच्या हालचाली सुरू असल्याचेही इस्रायलने बजावले होते.

या पार्श्‍वभूमीवर, जनरल सलामी यांनी केलेल्या विधानांबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय इस्लामी लष्कराबाबत जनरल सलामी यांच्यासारख्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी केलेली घोषणा जाणकारांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे पडसाद लवकरच उमटण्याची दाट शक्यता समोर येत आहे.

English हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info