Breaking News

अमेरिकेच्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी इराण रशियाकडून संवर्धित युरेनियम मिळविणार – इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या उपप्रमुखांची घोषणा

तेहरान/मॉस्को – अमेरिकेने लादलेल्या कठोर निर्बंधांचा निषेध करण्यासाठी इराणने अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी इराणने रशियाकडे सोपविलेला संवर्धित युरेनियमचा साठा परत घेण्याची घोषणा केली. इराणने संवर्धित युरेनियमचा साठा मिळवून अणुकार्यक्रम सुरू करणे म्हणजे युरोपिय देशांनी अजूनही जिवंत ठेवलेल्या अणुकराराचे उल्लंघन ठरते, असा ठपका इस्रायलच्या माध्यमांनी ठेवला आहे. तर आपल्या या कारवाईला अमेरिका जबाबदार असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

युरेनियम, वेग, निषेध, अणुउर्जा संघटना, अणुकरार, रशिया, उल्लंघन, Iran, ww3, चीनअमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतली असली तरी रशिया व युरोपिय देशांनी या अणुकराराचे पालन करण्याची ग्वाही दिली होती. तसेच अमेरिकेने माघार घेतली तरी इराणने या अणुकराराचे उल्लंघन करू नये, असे सांगून रशिया, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन व चीन या देशांनी इराणला आश्‍वस्त केले होते. मात्र सदर अणुकरारानुसार इराणने रशियाकडे सोपविलेला संवर्धित युरेनियमचा साठा माघारी घेण्याची तयारी करून इराणने आपली पाठराखण करणार्‍या देशांना धक्का दिला आहे.

रशियाकडील २० टक्के संवर्धित युरेनियमचा साठा परत घेणार असल्याची घोषणा इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे उपप्रमुख ‘बेहरोझ कमालवन्दी’ यांनी केली. ‘अणुकरार जिवंत राहिला असता तर इतर देशांनी इराणच्या अणुकार्यक्रमासाठी इंधन पुरविले असते. पण जर अणुकरारच राहणार नसेल तर इराणला २० टक्के संवर्धित युरेनियमची निर्मिती करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही’, असे सांगून कमालवन्दी यांनी इराणच्या या निर्णयासाठी अमेरिकेला जबाबदार धरले.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या कठोर निर्बंधांची घोषणा केली. या निर्बंधांनुसार रशिया, चीन व युरोपिय मित्रदेशांनी इराणशी आर्थिक तसेच व्यापारी संबंध ठेवणे निर्बंधित असेल. तसेच इराणबरोबर डॉलर आणि सोन्यातून होणार्‍या व्यापारावरही अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत. याआधीच खिळखिळी झालेली इराणची अर्थव्यवस्था या नव्या निर्बंधांमुळे कोंडीत सापडली आहे.

युरेनियम, वेग, निषेध, अणुउर्जा संघटना, अणुकरार, रशिया, उल्लंघन, Iran, ww3, चीनया निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी इराणने रशियाकडूनच संवर्धित युरेनियमचा साठा मिळविण्यास सुरुवात केल्याची माहिती कमालवन्दी यांनी एका इराणी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. २०१५ साली झालेल्या अणुकराराप्रमाणे इराणने आपल्याकडील २० टक्क्यांहून अधिक संवर्धित युरेनियमचा साठा रशियाकडे सोपविणे आवश्यक होते. इराणने ३०० किलो इतका संवर्धित युरेनियमचा साठा रशियाकडे सोपविला होता. पण इराणने हा साठा मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच दुसरा साठाही इराणमध्ये दाखल होईल, असे कमालवन्दी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इराणकडे कमी प्रमाणात संवर्धित केलेला नऊ टन युरेनियमचा साठा असल्याचा दावा इस्रायली विश्‍लेषक व माध्यमे करीत आहे. या संवर्धित युरेनियचा वापर वीजनिर्मितीसाठी करीत असल्याचे इराणचे म्हणणे आहे. पण या युरेनियमना अधिक प्रमाणात संवर्धित केल्यास त्याचा वापर अण्वस्त्रनिर्मितीसाठी होऊ शकतो, असा आरोप इस्रायल करीत आहे. त्यात रशियाकडून उच्च प्रतीच्या संवर्धित युरेनियमचा साठा मिळवून इराणने युरोपिय देशांनी जिवंत ठेवलेल्या अणुकराराचे उल्लंघन केल्याची टीका इस्रायली माध्यमे करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info