जगातील २०० कोटी नागरिकांना भीषण दुष्काळ, अन्नटंचाई व उपासमारीचा फटका – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जगातील २०० कोटी नागरिकांना भीषण दुष्काळ, अन्नटंचाई व उपासमारीचा फटका – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

रोम – जगातील तब्बल २०० कोटी नागरिकांना भीषण दुष्काळ, अन्नटंचाई, उपासमारी व कुपोषणाचा फटका बसल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेने केला आहे. २०१५ सालापासून अन्नटंचाई व उपासमारीची वेळ ओढवलेल्या लोकांमध्ये सातत्याने वाढ होत असून ही संख्या ८२ कोटींवर गेल्याची जाणीव संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालातून करून दिली. हाच कल कायम राहिला तर २०३० सालातील ‘झीरो हंगर’चे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण जाईल, अशी खंत अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ‘फूड ऍण्ड ऍग्रिकल्चर असोसिएशन’ने (एफएओ) इतर यंत्रणांच्या सहाय्याने २०१८ सालातील भीषण वास्तव मांडणारा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. ‘द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी ऍण्ड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड’ नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात, पुरेसे अन्न न मिळणार्‍यांची संख्या सातत्याने वाढतच चालल्याची जाणीव करून देण्यात आली. त्याचवेळी जगातील प्रत्येक खंडात व क्षेत्रात ‘लठ्ठपणा’ व ‘जास्त वजना’ची समस्या असणार्‍यांच्या आकडेवारीतही भर पडत असल्याचा विरोधाभास अहवालाच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे.

‘जगातील दारिद्य्र दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये गरीबातील गरीब जनतेला अन्नसुरक्षा व संतुलित आहार कसा मिळेल, या घटकांचाही समावेश करायला हवा. त्यासाठी मोठे धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. त्याचवेळी संभाव्य आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी आधीच होणे आवश्यक आहे. हे करताना आरोग्य व शिक्षणासारख्या अत्यावश्यक गोष्टींमध्ये कपात होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी’, अशा शब्दात अन्नटंचाई व उपासमारी टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

आर्थिक विकासात मागे पडलेल्या तसेच संपत्तीच्या बाबतीत असमान वाटप असणार्‍या देशांमध्ये उपासमारी, अन्नटंचाई व कुपोषणाचे प्रमाण वाढते असल्याच्या वास्तवाकडे संयुक्त राष्ट्रांच्या अहबालात लक्ष वेधण्यात आले आहे. अन्नटंचाई व उपासमारीचा सर्वाधिक फटका आशिया खंडाला बसला असून या भागात ५१ कोटींहून अधिक जणांना नियमित अन्नापासून वंचित रहावे लागले आहे. आफ्रिका खंडातील २५ कोटींहून अधिक जनतेला पुरेसे अन्न मिळत नसून लॅटिन अमेरिकेतील चार कोटींहून अधिक नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

जगभरात सुरू असलेले संघर्ष, वाढते अस्थैर्य, हवामानबदल व अर्थव्यवस्थेतील मंदीची स्थिती हे घटक अन्नटंचाई व उपासमारीसारख्या समस्यांवर प्रभाव टाकणारे प्रमुख घटक ठरल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info