Breaking News

व्हेनेझुएलाच्या निर्वासितांमुळे शेजारी देश संकटात – ब्राझिलने सीमेवरील सैन्याची तैनाती वाढविली; ‘पेरू’कडून सीमेजवळील प्रांतात आणिबाणी घोषित

ब्रासिलिया – व्हेनेझुएलाची समस्या या देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ही समस्या सार्‍या खंडाला व्यापून टाकणारी ठरते आहे, अशा शब्दात ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मायकल टेमर यांनी व्हेनेझुएलाला लागून असलेल्या आपल्या सीमाभागात सैन्याची तैनाती वाढविली आहे. तर पेरूने व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील आपल्या प्रांतात ६० दिवसांची आरोग्यविषयक आणिबाणी घोषित केली. व्हेनेझुएलातून या देशांमध्ये शिरणार्‍या लोंढ्यांच्या पार्श्‍वभूमीवर ब्राझिल व पेरूने ही खबरदारी घेतली असली तरी व्हेनेझुएलाच्या मदुरो सरकारने मात्र यामागे कट असल्याचा आरोप केला आहे.

ब्राझिल, सैन्याची तैनाती, मदुरो सरकार, आणिबाणी, निर्वासित, कट, ww3, पेरू, Venezuela, युरोपव्हेनेझुएलातून दुसर्‍या देशांमध्ये शिरणारे निर्वासितांचे संकट २०१५ साली युरोपवर आदळलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांप्रमाणेच असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने म्हटले होते. व्हेनेझुएलाच्या चलनाची ९९ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर या देशातून निर्वासितांचे लोंढे शेजारी देशात शिरू लागले होते. अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची टंचाई यामुळे त्रस्त झालेली व्हेनेझुएलाची जनता पुढच्या काळात इतर शेजारी देशांची दारे ठोठावल्यावाचून राहणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. कोलंबिया, इक्वेडोर, ब्राझिल व पेरू या देशांमध्ये शिरत असलेले व्हेनेझुएलाचे नागरिक हेच दाखवून देत आहे.

कोलंबियात दहा लाखाहून अधिक व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तर इक्वेडोरमधल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांची संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली आहे. पेरूमध्ये चार लाख तर ब्र्राझिलमध्ये ६० हजार व्हेनेझुएलाचे निर्वासित आहेत. ही संख्या अधिक वाढली तर त्यामुळे ब्राझिलची सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष मायकल टेमर यांनी दिला आहे. यासाठी व्हेनेझुएलाच्या सीमेजवळील भागात सैन्यतैनाती करण्याची घोषणा टेमेर यांनी केली. या सैनिकांवर व्हेनेझुएलातून आलेल्या निर्वासितांना सहाय्य करण्याचीही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष टेमर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, व्हेनेझुएलातून ब्राझिलच्या सीमेत दाखल झालेल्या निर्वासितांबरोबर स्थानिकांची दंगल पेटल्याचे समोर आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांना सदर सैन्यतैनातीचा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. तर पेरूने व्हेनेझुएलाजवळीस सीमेवरील आपल्या भागांमध्ये आरोग्यविषयक आणिबाणीची घोषणा केली आहे. या ठिकाणी औषधांच्या टंचाईमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, व्हेनेझुएलाच्या मदुरो सरकारने मात्र ब्राझिल आणि पेरू या देशांनी केलेल्या या घोषणा म्हणजे आपल्या विरोधातील कट असल्याचा ठपका ठेवला आहे. व्हेनेझुएलाच्या सरकारची मानहानी करण्यासाठी व या सरकारला धक्का देण्यासाठी हे कारस्थान आखले जात असल्याचा दावा मदुरो सरकारच्या प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या जनतेची दिवसेंदिवस अधिकाधिक परवड होत असून या देशातील ८० टक्के नागरिक अन्नान दशेत असल्याचे समोर आले आहे. तरीही राष्ट्राध्यक्ष मदुरो यांचे सरकार इतर देशांवर कटकारस्थानांचे आरोप करून आपली बाजू सावरत असल्याचे दिसते. मात्र या देशातील अस्थैर्य व अराजकाचे परिणाम आता शेजारी देशांवरही होऊ लागले असून कोलंबिया, इक्वेडोर, ब्राझिल व पेरू हे व्हेनेझुएलाचे शेजारी देश देखील यामुळे धोक्यात आले आहेत.

English   हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info