अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे रस्ते रक्ताने माखतील – अमेरिकी अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार मार्क मोबिअस यांचा इशारा

अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे रस्ते रक्ताने माखतील – अमेरिकी अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार मार्क मोबिअस यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिका व चीनदरम्यान सुरू असणारे व्यापारयुद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाणार असून जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचे ‘रक्तरंजित’ परिणाम होतील व याने रस्ते रक्ताने माखतील असा विचलित करणारा इशारा अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार मार्क मोबिअस यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनविरोधातील वक्तव्यांना गेल्या महिन्याभरात अधिकच धार आली असून त्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील वैयक्तिक मैत्रीही संपुष्टात आल्याचा दावा केला होता. तर, ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडणार्‍या चीनने व्यापारी तसेच संरक्षणविषयक चर्चा रद्द करून अमेरिकेला इशारा दिला होता.

‘वर्ल्ड बँके’चे माजी अधिकारी व ‘मोबिअस कॅपिटल पार्टनर्स’चे प्रमुख मार्क मोबिअस यांनी अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध नजिकच्या काळात मिटण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले. ‘अमेरिका व चीनमध्ये चर्चा झालीच तर चीन अतिशय आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. चीन सहजासहजी माघार घेणार नाही. शेवटी हा 300 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी फायद्याचा मुद्दा आहे. त्यामुळे चीन तो सहजासहजी सोडून देणार नाही’, असे मोबिअस यांनी बजावले.

‘अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धामध्ये दोन्ही देश कदाचित सहा महिन्यांनंतर काहीतरी समझोता करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुधा व्यापारयुद्ध मिटलेले असेल. पण या मधल्या कालावधीमध्ये अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचे रक्तरंजित परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत पहायला मिळतील’, असा इशारा अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी दिला. मोबिअस यांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेने आतापर्यंत चीनच्या 250 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर कर लादले आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना चीनने अमेरिकेच्या 50 अब्ज डॉलर्स आयातीवर कर लादले असून 60 अब्ज डॉलर्स आयातीवर कर लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या संपूर्ण 500 अब्ज डॉलर्सहून अधिक आयातीला लक्ष्य करण्याचा इशारा दिला असून अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे बजावले आहे.

गेल्या काही महिन्यात ट्रम्प यांनी ‘मेक्सिको’ व ‘कॅनडा’बरोबर नवा त्रिपक्षीय व्यापारी करार करण्यात यश मिळविले आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियाबरोबर नवा व्यापारी करारही करण्यात आला असून जपानबरोबरही कराराची बोलणी सुरू आहेत. कॅनडा व मेक्सिकोबरोबर केलेल्या करारात त्या देशांना चीनबरोबर व्यापारी करार करण्यास बंदीची अट टाकून अमेरिकी प्रशासनाने चीनची कोंडी केली आहे. त्याचवेळी एकामागोमाग एक अशा दोन व्यापारी करारांमध्ये मिळालेल्या यशामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता चीनविरोधात अधिक आक्रमक होतील, असे संकेत विश्‍लेषक तसेच सूत्रांकडून देण्यात येत आहेत.

अमेरिकेने आतापर्यंत लादलेल्या करांमुळे चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याचे आधीच समोर आले असून ट्रम्प यांची नवी कारवाई चीनला अधिक मोठे धक्के देणारी असेल, असे सांगण्यात येते. त्यामुळे मोबिअस यांनी रक्तरंजित परिणामांचा दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

गेल्याच महिन्यात ब्रिटीश विश्‍लेषक फ्रान्सेस्को मॉस्कॉन यांनी, अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचे रूपांतर खर्‍या युद्धात होईल, असा गंभीर इशारा दिला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info