अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल घोषित; ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा सिनेटवर ताबा – डेमोक्रॅटस्ने प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळविले

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल घोषित; ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा सिनेटवर ताबा – डेमोक्रॅटस्ने प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळविले

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन सिनेटवरील आपली पकड घट्ट केली असून हा सर्वात मोठा विजय असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता ओसरली व अमेरिकी जनता त्यांच्या विरोधात गेल्याचे दावे निकालात निघाले आहे. मात्र असे असले तरी विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पार्टीने प्रतिनिधीगृहावर ताबा मिळवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे काही राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

या मध्यावधी निवडणुकीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीवरील अमेरिकन जनमताचा कौल म्हणून पाहिले जात होते. विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पार्टीने ट्रम्प यांच्यापासून अमेरिकेला वाचविण्यासाठी ही मध्यावधी निवडणूक म्हणजे संधी ठरेल, असल्याचा दावा केला होता. तर या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला यश मिळाले तर अमेरिकेत रक्तपात होईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तसेच त्यांच्या विरोधकांचेही राजकीय भवितव्य पणाला लागल्याचे दिसत होते. डेमोक्रॅट पक्षाचे काही नेते व समर्थक या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाचा मोठा पराभव होऊन त्यांचे सरकार कोसळेल, असे दावे करू लागले होते.

मात्र या मध्यवधी निवडणुकीनंतर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला सिनेटवरील आपली पकड भक्कम करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात जनक्षोभाची लाट उसळेल, असा दावा करणार्‍या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. मात्र असे असले तरी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅट पक्षाने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांनी आपला पक्ष ट्रम्प प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सूचक विधान केले आहे.

प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅट पक्षाच्या प्राबल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निर्णय रोखण्याचे व त्यांच्या धोरणांना आव्हान देण्याचे काम डेमोक्रॅट पक्षाकडून केले जाऊ शकते, अशी चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र आपल्या पक्षाला फार मोठा विजय मिळाल्याचा दावा करून त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

या मध्यावधी निवडणुकीत मोठ्या संख्येने झालेले मतदान ट्रम्प यांच्या बाजूने व विरोधात असलेल्या मतदारांच्या तीव्र भावना व्यक्त करीत असल्याचा दावा राजकीय विश्‍लेषक करीत आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांची लोकप्रियता ओसरलेली नाही, याचाही दाखला या निवडणुकीत मिळाल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info