लेबेनॉनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले

लेबेनॉनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले

बैरूत – लेबेनॉनच्या सीमाभागातून इस्रायलच्या उत्तरेकडील ‘अविवीम’ शहरावर क्षेपणास्त्र हल्ले झाले. इस्रायलकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लेबेनीज लष्कराने ही कारवाई केल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इस्रायली लष्कराने आपल्या सैनिकांना ‘हाय अलर्ट’वर ठेवले असून लेबेनॉन व हिजबुल्लाहकडून हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा इस्रायली यंत्रणांनी दिला होता.

रविवारी सकाळी इस्रायली रणगाड्यांनी लेबेनॉनच्या सीमेत हल्ला चढविल्याचा आरोप हिजबुल्लाह समर्थक वृत्तसंस्थेने केला होता. ‘शिबा फार्म्स’ येथील ‘कफार चौबा’ या भागात इस्रायली तोफगोळे धडकले होते. तर या हल्ल्याव्यतिरिक्त इस्रायली ड्रोनने देखील आपल्या हवाई हद्दीचे नव्याने उल्लंघन केले व इस्रायली ड्रोनने लेबेनॉनच्या हद्दीत स्फोटके टाकल्याचा ठपका लेबेनीज लष्कराने ठेवला. लेबेनीज लष्कराच्या या आरोपांवर इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण रविवारी दुपारी लेबेनॉनच्या दक्षिण सीमाभागातून इस्रायलच्या ‘अविवीम’ शहरावर रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचे हल्ले झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांनी ‘बॉम्ब शेल्टर’मध्ये आश्रय घेतला आहे. लेबेनीज लष्कर तसेच हिजबुल्लाहकडून इस्रायलवर आणखी हल्ले चढविले जातील, अशी शक्यता इस्रायली लष्कराने व्यक्त केली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने ‘नॉर्दन कमांड’ला सज्ज राहण्याचे आदेश दिले असून सुट्टीवर गेलेल्या जवानांना तत्काळ सेवेवर रूजू होण्याची सूचना केली आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या लष्कराने लेबेनॉनमध्ये तीनवेळा ड्रोन तसेच लढाऊ विमानांचे हल्ले चढविले होते. यापैकी पहिल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचे क्षेपणास्त्रांचे कोठार नष्ट झाल्याचा दावा इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केला होता. यामुळे खवळलेल्या हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाने याचा लवकरच सूड घेण्यात येईल, अशी धमकी दिली होती. येत्या काही तासात इस्रायलला आपल्यावरील हल्ल्याची किंमत चुकती करावी लागेल, असे नसरल्ला म्हणाला होता.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री ‘यीस्रायल कात्झ’ यांनी हिजबुल्लाह प्रमुखाच्या या धमकीला उत्तर दिले. ‘येत्या काळात नसरल्लाच्या इशार्‍यावर लेबेनॉनमधून इस्रायलवर हल्ले झाले तर इतिहासात लेबेनॉनचा विध्वंस करणारा म्हणून नसरल्ला ओळखला जाईल. त्यामुळे लेबेनॉनने इराणच्या हातातील या बाहुल्याच्या इशार्‍यावर नाचणे थांबवावे’, अशा नेमक्या शब्दात कात्झ यांनी लेबेनॉनला समज दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info