फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेला ‘युरोपियन आर्मी’चा प्रस्ताव अपमानास्पद

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेला ‘युरोपियन आर्मी’चा प्रस्ताव अपमानास्पद

पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अमेरिकेव्यतिरिक्त ‘युरोपियन लष्करा’बाबत मांडलेली संकल्पना अत्यंत अपमानास्पद असल्याची तीव्र नाराजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी एका लेखात रशिया, चीन व अमेरिकेपासून युरोपला सुरक्षित राखण्यासाठी खर्‍या व समर्थ युरोपियन लष्कराची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले होते.

युरोपिय महासंघात गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र युरोपियन लष्करासाठी हालचाली सुरू असून जर्मनी व फ्रान्स या देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन देशांच्या या आघाडीला ब्रिटनने कडाडून विरोध केला असून आतापर्यंत महासंघात आलेले प्रस्ताव स्पष्ट शब्दात नाकारले आहेत. मात्र ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटन महासंघाच्या बाहेर पडत असल्याने पुन्हा एकदा स्वतंत्र युरोपिय लष्कराच्या हालचालींना वेग आला आहे.

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी काही दिवसांपूर्वी ‘युरोप 1’ या रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा युरोपियन लष्कराच्या प्रस्तावाचा उल्लेख केला होता. ‘चीन, रशियाबरोबरच अमेरिकेपासूनही युरोपला सुरक्षित राखणे आवश्यक असून त्यासाठी समर्थ अशा युरोपियन लष्कराची गरज आहे’, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी युरोपिय लष्कराबाबत भूमिका मांडली होती. या वक्तव्यात चीन व रशियाच्या बरोबरीने अमेरिकेचा केलेला उल्लेख खळबळ उडविणारा ठरला होता.

मॅक्रॉन यांनी आपल्या मुलाखतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाबरोबरील ‘आयएनएफ ट्रिटी’ या अण्वस्त्रविषयक करारातून घेतलेल्या माघारीचा उल्लेख केला होता. या माघारीमुळे युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यासाठी अमेरिकाच जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत युरोपला स्वतंत्र लष्कराची आवश्यकता असल्याचे सांगितले. अमेरिका, चीन व रशियापासून युरोपला सुरक्षित ठेवण्यासाठी याची गरज असल्याचा त्यांचा दावा आहे. हे वक्तव्य अमेरिकेसाठी अत्यंत अपमानास्पद आहे. युरोपने पहिल्यांदा नाटोतील त्यांचा हिस्सा उचलावा. हे काम सध्या अमेरिकेकडूनच केले जात आहे, याची त्यांनी जाणीव ठेवावी’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अमेरिका व फ्रान्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला असून इराणवरील निर्बंध आणि युरोपवर लादलेले व्यापारी कर ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युरोपबाबत घेतलेली भूमिका आणि राष्ट्रवादी गटांना देण्यात येणारे समर्थन हे देखील वादाचे मुद्दे ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर युरोपियन लष्कराचा मुद्दा दोन देशांमधील तणाव अधिक चिघळवणारा ठरेल, असे संकेत देण्यात येत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info