Breaking News

‘गायडेड बुलेट्स’, ‘एक्सोस्केलेटॉन’ने अमेरिकी लष्कर लवकरच सज्ज होणार

लंडन – हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये दाखविली जाणारी अतिशयोक्तीपूर्ण वाटणारी शस्त्रास्त्रे लवकरच अमेरिकेच्या लष्कराच्या हाती येणार आहेत. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांप्रमाणे स्नायपर बंदूकीसाठी ‘गायडेड बुलेट्स’, युद्धक्षेत्रात सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवून त्यांना सुपर सोल्जर बनविणारे चिलखत, विषाणूंची लागण करण्यात आलेले कीडे, पाणुबड्यांचा वेध घेणारे ड्रोन्स, अंतराळातील युद्धासाठी ‘फँटम प्लेन’ आणि आण्विक किंवा किरणोत्सर्गी हल्ल्याची माहिती देणारी यंत्रणा अमेरिकेने विकसित केली आहे. हा अतिप्रगत शस्त्रसाठा व साहित्य लवकरच अमेरिकेच्या संरक्षणदलात दाखल होईल, अशी माहिती समोर येत आहे.

अमेरिकी लष्कर, सज्ज, गायडेड बुलेट्स, guided bullets, क्षेपणास्त्र, आव्हानांचा सामना, ww3, लंडन, चीनअमेरिकेच्या लष्कराची अतिशय गोपनीय व वादग्रस्त प्रयोगशाळा ‘डिफेन्स अ‍ॅडव्हान्सड् रिसर्च प्रोजेकट्स एजन्सी’ अर्थात ‘डार्पा’ने हा शस्त्रसाठा तयार करून त्यांची चाचणी घेतली आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून ‘डार्पा’ने गायडेड बुलेट्स आणि जीवघेणे कीडे तयार केले आहेत. यापैकी गायडेड बुलेट्स आपल्या टार्गेटचा अचूकपणे वेध घेतात. स्नायपर बंदुकीच्या लेझरने निश्‍चित केलेले लक्ष्य गायडेड बुलेट्स यशस्वीरित्या भेदतात, असा दावा ‘डार्पा’ने केला आहे.

तर अमेरिकेच्या प्रयोगशाळेने झाडांवरील नाकतोड्यासारखा किडा विकसित केला आहे. याबाबत ‘डार्पा’ने अधिक माहिती दिलेली नाही. पण हे कीडे देखील लष्करासाठी सहाय्यक ठरू शकतात आणि सैनिकाप्रमाणे हल्लेही चढवू शकतात, हे सिद्ध झाल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या लष्करी प्रयोगशाळेने एका साध्या सैनिकाला ‘सुपर सोल्जर’ बनविणारे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.

‘सुपर हिरो’ चित्रपटात दाखविल्याप्रमाणे शिडशिडीत बांध्याच्या सैनिकाची जैविकदृष्ट्या क्षमता वाढविणारे चिलखती तंत्रज्ञान तयार झाले आहे. सदर चिलखत परिधान करताच सैनिकाच्या हालचालींचा वेग तसेच त्याच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. यामुळे युद्धक्षेत्रात सैनिक अनेक तास लढू शकतो. या चिलखतामध्ये सेन्सर्स, मायक्रो कॉम्प्युटर यांची जोड आहे.

या व्यतिरिक्त अमेरिकेच्या युद्धनौकांना आव्हान देणार्‍या शत्रूच्या पाणबुड्या तसेच सागरी सुरूंग हुडकून त्यांचा बंदोबस्त करणारे ड्रोन्सही तयार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून या ड्रोनची चाचणी सुरू आहे. तर अंतराळातील अमेरिकेच्या सॅटेलाईट्सची काळजी घेणारे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमा राबविणारे ‘फँटम प्लेन’तयार झाले असून पुढील दोन वर्षात अमेरिकेचे हे प्लेन भरारी घेऊ शकते.

गेल्या काही महिन्यांमध्ये चीन व रशियाने आपल्या प्रगत शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करून अमेरिका व मित्रदेशांना धमकावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या लष्कराने रशिया व चीनकडून मिळत असलेल्या या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढची तयारी केल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info