Breaking News

उत्तर कोरियाकडून ’टॅक्टिकल वेपन’ची चाचणी अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित

सेऊल – अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मिती थांबविण्याचे आश्‍वासन देणार्‍या उत्तर कोरियाने अत्यंत आधुनिक सामरिक शस्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जॉंग-उन’ यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. सदर सामरिक शस्त्र उत्तर कोरियाच्या सुरक्षेसाठी ‘पोलादी भिंत’ ठरेल, असा दावा उत्तर कोरियन राजवटीने केला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियातील भुयारी क्षेपणास्त्रांचे तळ अजूनही कार्यरत असल्याचा दावा अमेरिकेतील अभ्यासगटाने केला होता.

जून महिन्यात सिंगापूर येथील बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन उत्तर कोरियन हुकूमशहा ‘किम जॉंग-उन’ यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या मागण्यांची उत्तर कोरिया पूर्तता करील, असा विश्‍वास अमेरिकेने व्यक्त केला होता. उत्तर कोरियाने देखील अणुचाचणीचे तळ नष्ट करून तसेच सीमेवरील सैन्यतैनाती कमी करून सकारात्मक संकेत दिले होते. पण गेल्या काही आठवड्यांपासून उत्तर कोरियाच्या छुप्या हालचाली उघड होत आहेत.

शुक्रवारी उत्तर कोरियन राजवटीशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने ‘अत्यंत आधुनिक सामरिक शस्त्रा’ची चाचणी घेतल्याची माहिती जाहीर केली. ‘आजची ही यशस्वी चाचणी उत्तर कोरियाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती स्पष्ट करणारा आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या संरक्षणसामर्थ्यात मोठी वाढ झाली असून आपल्या लष्कराची युद्ध लढण्याची क्षमता अधिक बळकट झाली आहे’, अशी घोषणा उत्तर कोरियन हुकूमशहा किम यांनी केली. या शस्त्राबाबत उत्तर कोरियन राजवट तसेच वृत्तवाहिनीने कुठलीही माहिती प्रसिद्ध केली नाही.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील अभ्यासगटाने उत्तर कोरियातील सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. यामध्ये उत्तर कोरियाने डोंगराळ भागात किमान १३ छुपे क्षेपणास्त्र तळ कार्यरत केल्याचे उघड झाले होते. या तळांमध्ये उत्तर कोरियाने आपले मध्यम व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे लपविल्याची शक्यता अमेरिकेच्या अभ्यासगटाने वर्तविली होती. त्याचबरोबर उत्तर कोरिया अमेरिकेबरोबर झालेल्या वाटाघाटींच्या नियमांचे पालन करीत नसल्याचा दावाही या अभ्यासगटाने केला होता.

पण ट्रम्प प्रशासन उत्तर कोरियाबरोबरच्या वाटाघाटीच्या भूमिकेवर ठाम आहे. तसेच ‘ट्रम्प-किम’ भेटीतील अमेरिकेच्या मागण्या उत्तर कोरियन राजवट पूर्ण करील, असा विश्‍वासही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केला होता. तसेच येत्या वर्षअखेरीस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उत्तर कोरियन हुकूमशहा किम यांची आणखी एक भेट घेणार असल्याचे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info