Breaking News

युरोपिय महासंघाकडून ‘ब्रेक्झिट’ कराराला मंजुरी – यापुढे करारात बदल शक्य नसल्याचा महासंघाचा ब्रिटनला इशारा

ब्रुसेल्स/लंडन – ‘युरोपिय महासंघाच्या २७ सदस्य देशांनी ब्रिटनकडून सादर करण्यात आलेल्या ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिली आहे. हाच करार सर्वोत्कृष्ट व अंतिम आहे’, अशा शब्दात युरोपिय महासंघाने ‘ब्रेक्झिट’ कराराला मान्यता दिली. रविवारी बु्रसेल्समध्ये झालेल्या विशेष बैठकीत अवघ्या ३८ मिनिटांच्या बैठकीत महासंघाच्या सदस्यांनी ब्रिटीश सरकारकडून देण्यात आलेला प्रस्ताव स्वीकारला. महासंघाचे प्रमुख जीन क्लॉड जंकर यांनी ही घटना एक शोकांतिका असल्याचे सांगून खेद व्यक्त केला. सरकारच्या कराराचा विरोध करणार्‍या ब्रिटीश नेत्यांनी, पंतप्रधान थेरेसा मे यांनी महासंघाला हवे ते सर्व दिल्यानेच महासंघाने झटपट करार मंजूर केला, असे टीकास्त्र सोडले आहे.

ब्रेक्झिट करार, मंजुरी, थेरेसा मे, युरोपिय महासंघ, विरोध, ww3, ब्रुसेल्स, स्पेनब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी काही दिवसांपूर्वी ‘ब्रेक्झिट’ कराराचा प्रस्ताव युरोपिय महासंघाकडे सोपविला होता. या प्रस्तावावरून ब्रिटनमध्ये प्रचंड राजकीय वादळ उठले असून मे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र मे यांनी ब्रिटीश जनतेने ‘ब्रेक्झिट’बाबत जो निर्णय घेतला त्याचा आदर राखायला हवा, असे सांगून प्रस्ताव तयार केल्याची ग्वाही दिली होती. त्याचवेळी प्रस्ताव तयार करताना प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नाही, अशी पुस्तीही जोडली होती.

युरोपिय महासंघाने ब्रिटनच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेऊन तो २७ सदस्य देशांकडे पाठविला होता. या प्रस्तावावर स्पेन व आयर्लंडकडून काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. स्पेनने ‘जिब्राल्टर’च्या मालकीचा मुद्दा उपस्थित करून नकाराधिकाराची धमकीही दिली होती. मात्र स्पेन व ब्रिटनमध्ये झालेल्या चर्चेनंतर स्पेनने तडजोड स्वीकारून ‘ब्रेक्झिट’ कराराला मान्यता दिली. आयर्लंडने वादाचे मुद्दे उपस्थित केल्यानंतरही ‘ब्रेक्झिट’ला मान्यता देऊन महासंघासमोरील अडथळा दूर केला.

रविवारी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या उपस्थितीत ब्रुसेल्समध्ये महासंघाची विशेष बैठक पार पडली. अवघ्या ३८ मिनिटांच्या बैठकीत वादग्रस्त मुद्दे टाळून महासंघाने ‘ब्रेक्झिट’ कराराला मान्यता दिल्याचे जाहीर केले. युरोपियन कौन्सिलचे प्रमुख डोनाल्ड टस्क यांनी सोशल मीडियावर याची माहिती देतानाच पुढे काय होईल, हे सांगण्यास नकार दिला. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, ब्रिटन बाहेर पडणे ही अत्यंत दुःखद बाब असल्याची प्रतिक्रिया दिली.

महासंघाचे प्रमुख जंकर यांनी, रविवारी देण्यात आलेली मान्यता ‘शोकांतिका’ असल्याचे सांगून या कराराला ब्रिटीश संसदेने मान्यता द्यायलाच हवी, असे बजावले. ब्रिटीश संसद सदस्यांनी सध्याचा करार नाकारला तर ब्रिटनला याहून चांगले काहीच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा असा इशाराही जंकर यांनी दिला.

ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात ‘ब्रेक्झिट’ कराराच्या मान्यतेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कराराचे समर्थन करणार्‍यांनी आता यापुढे ब्रिटीश जनता व महासंघाच्या निर्णयाचा आदर राखून संसदेत मंजुरी मिळायला हवी, असा दावा केला आहे. तर पंतप्रधान मे यांनी महासंघाच्या सर्वच मागण्या मान्य केल्यानेच महासंघाची मंजुरी मिळाल्याचे सांगून संसदेतील विरोध कायम राहिल, असा इशारा दिला. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटीश जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले असून त्यात ‘ब्रेक्झिट’ कराराच्या मुद्यावर आपल्या पाठीशी उभे रहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info