Breaking News

ब्राझिल-व्हेनेझुएलामधील वादामुळे लॅटिन अमेरिकेतील तणावात वाढ

रिओ दि जानिरो/कॅराकस – ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष झैर बोल्सोनारो यांनी पुढील महिन्यात होणार्‍या आपल्या शपथविधी समारंभासाठी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पाठविण्यात आलेले निमंत्रण रद्द केले आहे. त्याचवेळी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी अमेरिकेसह लॅटिन अमेरिकी देश आपल्याविरोधात लष्करी कारवाईची तयारी करीत असल्याचा आरोप करून त्यांचे सैन्य व्हेनेझुएलातून जिवंत बाहेर जाणार नाही, अशा शब्दात धमकावले आहे. ब्राझिल व व्हेनेझुएलात सुरू झालेल्या या नव्या वादामुळे लॅटिन अमेरिकेतील तणाव अधिकच वाढल्याचे दिसते.

मे महिन्यात व्हेनेझुएलात झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी गैरव्यवहार घडवून पुन्हा स्वतःलाच सहा वर्षांसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले होते. मदुरो यांच्या या निर्णयाचे लॅटिन अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले होते. लॅटिन अमेरिकेतील देशांची संघटना असणार्‍या ‘लिमा’ व ‘ओएएस’ने मदुरो यांना यापुढे अधिकृत पातळीवर राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचवेळी अमेरिकेनेही व्हेनेझुएलावर निर्बंध लादून राजवट बदलण्यासाठी अधिक आक्रमक कारवाईचे संकेत दिले.

मात्र राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी त्याला न जुमानता सत्तेवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी नव्या चलनाची घोषणा, राजवटीला समर्थन देणार्‍या नागरी गटांची (मिलिशिआ) व्याप्ती वाढविणे, देशांतर्गत निवडणुका घेणे यासारख्या हालचाली करून आपली राजवट सक्रिय असल्याचे चित्र उभे करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दुसर्‍या बाजूला रशिया व तुर्कीसारख्या देशांकडून घेतलेले अर्थसहाय्य व ‘अल्बा’ या सहकारी देशांच्या गटाचे समर्थन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील देश आपल्या पाठिशी उभे असल्याचे दाखविले आहे.

मदुरो यांच्या या प्रयत्नांना लॅटिन अमेरिकेतील प्रमुख देश असणार्‍या ब्राझिल व कोलंबियासारख्या देशांनी जोरदार विरोध केला आहे. ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सानारो यांनी पुढच्या महिन्यात होणार्‍या शपथविधी समारंभाचे आमंत्रण रद्द करून नजिकच्या काळात व्हेनेझुएलाविरोधातील भूमिका अधिक आक्रमक होईल, असे संकेत दिले आहेत. बोल्सानारो यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या ‘अर्नेस्टो अरोजो’ यांनी तर जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन व्हेनेझुएला स्वतंत्र करायला हवा, असे आवाहन करून खळबळ उडवली आहे.

बोल्सानारो यांचा मुलगा एदुआर्दो याने, व्हेनेझुएलात मदुरो राजवटीला विरोध करणार्‍या उजव्या गटांबरोबर हातमिळवणी केल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच एदुआर्दो याने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये मदुरो यांना उद्देशून ‘अंत जवळ आला आहे’, असे विधान केले होते. कोलंबियाने व्हेनेझुएलाला करण्यात येणारे सहकार्य बंद करण्याचा इशारा दिला असून सीमेवरील तैनाती वाढवली आहे.

या सर्व घडामोडींमुळे लॅटिन अमेरिकेतील तणाव अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत असून नजिकच्या काळात संघर्षाची ठिणगी उडू शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

 English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info