‘आयएस’च्या दहशतवाद्यांची संख्या दुप्पट झाली – कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरोर बरझानी

‘आयएस’च्या दहशतवाद्यांची संख्या दुप्पट झाली – कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरोर बरझानी

इरबिल – ‘‘‘आयएस’चा प्रमुख ‘अबु बक्र अल-बगदादी’ व त्याचे साथीदार ठार झाले असले तरी ही दहशतवादी संघटना आजही शाबूत आहे. सध्या या संघटनेतील दहशतवाद्यांची संख्या सहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट असून त्यांच्यापासून असलेला धोकाही तितक्याच प्रमाणात वाढला आहे. कारण ही संघटना पुनरागमनाची तयारी करीत आहे’’, असा इशारा इराकमधील कुर्दिस्तानचे पंतप्रधान मसरोर बरझानी यांनी दिला. दरम्यान, ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी इराकच्या दियाला प्रांतात घडविलेल्या स्फोटात एक इराकी सैनिक ठार झाला आहे.

अमेरिकी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्वायत्त कुर्दिस्तानचे पंतप्रधान बरझानी यांनी पुन्हा एकदा ‘आयएस’च्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने इराक व सिरियातील या दहशतवादी संघटनेच्या वाढत्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन बरझानी यांनी केले. ‘‘२०१४ साली ‘आयएस’ने इराक आणि सिरियातील भूप्रदेशावर ताबा मिळविण्यास सुरुवात केली, तेव्हा या दहशतवादी संघटनेकडे नव्हते, त्याहून दुप्पट दहशतवादी आता या संघटनेत आहेत’’, अशी माहिती बरझानी यांनी दिली.

इराक आणि सिरियामध्ये ‘आयएस’चे किमान २० हजार दहशतवादी असल्याचा दावा बरझानी यांनी केला. ‘या संघटनेने गेल्या काही महिन्यांमध्ये इराक-सिरियातील भूप्रदेश गमावला असेल, तसेच आपले नेतेही गमावले असतील. पण या संघटनेने पहिल्याहून अधिक अनुभवी दहशतवादी मिळविले असून हे एक आंतरराष्ट्रीय संकट आहे’, असा इशारा कुर्दिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला. ‘आयएस’ पुनरागमनाच्या तयारी असून इराक व सिरियामध्ये या संघटनेकडून मोठ्या कारवायांची शक्यता नाकारता येत नसल्याचे बरझानी म्हणाले.

याआधीही बरझानी यांनी इराक व सिरियातील ‘आयएस’च्या वाढत्या प्रभावाकडे आंतरराष्ट्रीय समुदायचे लक्ष वेधले होते. अमेरिका सिरियातून सैन्यमाघारीच्या तयारीत आहे. तर इराक सरकार अमेरिकी लष्कराला सैन्यमाघारीचे आवाहन करीत आहे. इराक व सिरियातून अमेरिकी लष्कराने माघार घेतली ‘आयएस’ वेगाने या देशांमध्ये आपला प्रभाव वाढविल, अशी चिंता बरझानी यांनी याआधी व्यक्त केली होती. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ तसेच गुप्तचर संघटनेने देखील इराक व सिरियातील ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करणे सोपे नसल्याचे म्हटले होते.

तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी गटाचे सहसचिव ‘व्लादिमिर वोरोन्कोव्ह’ यांनी या दहशतवादी संघटनेच्या आर्थिक प्रभावाकडे लक्ष वेधले होते. बगदादी किंवा इतर मोठे दहशतवादी ठार झाले असले तरी आजही या दहशतवादी संघटनेकडे ३० कोटी डॉलर्सचा निधी आहे. या निधीच्या सहाय्याने ‘आयएस’ जगभरात कुठेही मोठे हल्ले घडविण्याची क्षमता राखून असल्याचे वोरोन्कोव्ह यांनी बजावले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info