Breaking News

जपानकडून विक्रमी 242 अब्ज डॉलर्सचा संरक्षणखर्च मंजूर

टोकिओ – चीनकडून ईस्ट चायना सीमध्ये सुरू असलेल्या जपानविरोधी कारवाया व ‘साऊथ चायना सी’ तसेच पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी जपानने आपले संरक्षणविषयक धोरण अधिकच आक्रमक बनविले आहे. पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी 242 अब्ज डॉलर्सचा विक्रमी संरक्षणखर्चाला मंजुरी दिली असून याअंतर्गत जपान दोन विमानवाहू युद्धनौकांची निर्मिती करणार आहे. जपानच्या या निर्णयावर चीन तसेच दोन्ही कोरियन देशांनी आक्षेप घेतला. जपानने हा निर्णय मागे घ्यावा, असे चीनने बजावले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी जपानने अमेरिके  कडून तब्बल 100 ‘एफ-35’ या प्रगत स्टेल्थ विमानांच्या खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अमेरिकेच्या नौदलाकडून सर्वाधिक वापर होणार्‍या या ‘एफ-35’ लढाऊ विमानांनी जपानच्या वायुसेनेला सज्ज करण्याच्या पंतप्रधान अ‍ॅबे यांच्या निर्णयाकडे आश्‍चर्याने पाहिले जात होते. पण पुढच्या काही दिवसातच अ‍ॅबे सरकारने अमेरिकेची ही अत्याधुनिक व प्रगत लढाऊ विमाने जपान त्यांच्या नौदलातील ‘इझूमो’ श्रेणीतील हेलिकॉप्टरवाहू युद्धनौकेवर तैनात करणार असल्याचे संकेत दिले.

यासाठी ‘इझूमो’ श्रेणीतील हेलिकॉप्टरवाहू युद्धनौकांचे रुपांतर लढाऊ विमानांमध्ये करण्याची योजना जपानच्या संरक्षण मंत्रालयाने मांडली होती. जपानच्या आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांनी तसेच विश्‍लेषकांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अ‍ॅबे सरकारने अधिकृतरित्या याची घोषणा केली नव्हती. पण मंगळवारी पंतप्रधान अ‍ॅबे यांनी 242 अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाची घोषणा केली असून यामध्ये दोन विमानवाहू युद्धनौकांच्या फेरबांधणीसाठी मोठा निधी राखून ठेवल्याचे सांगितले जाते.

विमानवाहू युद्धनौका, स्टेल्थ लढाऊ विमानांबरोबर अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या खरेदीसाठीही अ‍ॅबे सरकारने विशेष तरतूद केल्याची माहिती समोर येत आहे. अ‍ॅबे सरकारचे सदर आक्रमक लष्करी धोरण चीनविरोधी असल्याचा दावा केला जातो. ‘ईस्ट चायना सी’ तसेच पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या नौदल हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी जपान संरक्षणसामर्थ्यात वाढ करीत आहे.

दरम्यान, दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात बचावात्मक धोरण स्वीकारणार्‍या जपानने गेल्या काही वर्षांपासून या धोरणात बदल सुरू केला होता.  जपानच्या या आक्रमक लष्करी धोरणाला अमेरिका व युरोपिय देशांचा पाठिंबा आहे. तर जपानचे हे धोरण चीनला मान्य नाही. जपानचे पंतप्रधान आपल्या देशाला दुसर्‍या महायुद्धाच्या काळासारखे आक्रमक बनवत असल्याची टीका चीन करीत आहे. 

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info