Breaking News

संसदेने ‘मेक्सिको वॉल’ची तरतूद नाकारल्याने अमेरिकेत ‘शटडाऊन’ सुरू

वॉशिंग्टन – अमेरिकी संसदेतील डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी ‘मेक्सिको वॉल’साठी पाच अब्ज डॉलर्स तरतुदीचा प्रस्ताव नाकारल्याने अमेरिकेसमोर पुन्हा एकदा ‘शटडाऊन’चे संकट उभे राहिले आहे. अवघ्या वर्षभरात या देशाला दुसर्‍या ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागले असून अमेरिकेतील आठ लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना त्याचा फटका बसला आहे. अमेरिकेसारख्या महान देशासाठी सीमेची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण आपल्या भूमिकेशी तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमासुरक्षा व ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीच्या मुद्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीतही ट्रम्प यांची विरोधी डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्यांशी खडाजंगी उडाल्याचे समोर आले होते. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने मंजूर केलेल्या विधेयकात ‘मेक्सिको वॉल’साठी आर्थिक तरतुदीचा समावेश होता.

मात्र सिनेटमध्ये झालेल्या बैठकीत या तरतुदीला डेमोक्रॅट पक्षाने विरोध केला. त्यानंतर संसदेच्या एकत्रित बैठकीतही डेमोक्रॅट पक्षाचा विरोध कायम राहिल्याने ‘फेडरल स्पेंडिंग बिल’ मंजूर होऊ शकले नाही. शनिवारी या विधेयकावर पुन्हा चर्चा होणार असली तरी मतदानाबद्दल अनिश्‍चितता कायम आहे. त्यामुळे अमेरिकी प्रशासनातील किमान 25 टक्के विभागांना अर्थसहाय्य बंद होणार असून त्याचा परिणाम आठ लाखांहून अधिक कर्मचार्‍यांवर होणार आहे.

‘शटडाऊन’ सुरू झाल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ट्रम्प यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात सीमासुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा उघड इशारा दिला आहे. त्याचवेळी या ‘शटडाऊन’साठी डेमोक्रॅट पक्षच जबाबदार असल्याचा दावाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या विधानावर डेमोक्रॅट पक्षाने तीव्र आक्षेप नोंदविले आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘शटडाऊन’ची जबाबदारी आपण घेण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. याचा संदर्भ देऊन डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा स्वभाव आणि बेजबाबदार वक्तव्ये ‘शटडाऊन’साठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकी प्रशासनाला वर्षात दुसर्‍या शटडाऊनला सामोरे जावे लागत असून त्याचे तीव्र परिणाम अर्थव्यवस्थेवर होतील, अशी भीती विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात, पेंटॅगॉन व सुरक्षा यंत्रणांशी संबंधित अतिरिक्त आर्थिक तरतूद सिनेटने फेटाळून लावल्यामुळे ट्रम्प प्रशासनाला ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागले होते.

वर्षभराच्या कालावधीत दोनवेळा ओढावलेले हे ‘शटडाऊन’चे संकट म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या विरोधकांमध्ये सुरू असलेल्या भीषण राजकीय संघर्षाचा परिपाक असल्याचे दिसत आहे. सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक नीति याबाबत ट्रम्प यांचे धोरण पूर्णपणे अमान्य असलेल्या विरोधकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवश्यक वाटते म्हणून मेक्सिकोच्या सीमेवर अब्जावधी डॉलर्स खर्च करून भिंत उभारण्याची गरज नाही, असे या विरोधकांचे म्हणणे आहे. तर ही भिंत अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यकच आहे, यावर ट्रम्प ठाम आहेत. तसेच यासाठी आर्थिक तरतूद करण्यास नकार देणार्‍या विरोधी पक्षांना ट्रम्प यांनी ‘शटडाऊन’चा निर्णय घेऊन कोंडीत पकडल्याचे दिसत आहे.

यावर अमेरिकेत जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. पण पुढच्या दोन ते तीन दिवसात या मुद्यावर तोडगा निघाला नाही, तर शटडाऊनचे अधिक तीव्र परिणाम समोर येतील. यामुळे ट्रम्प यांच्या विरोधकांवर अमेरिकी जनतेचे दडपण येण्याचीही दाट शक्यता आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info