चीनने खरेदी केलेले ट्रिलियन डॉलर्सचे अमेरिकी कर्जरोखे रद्द करा – अमेरिकन सिनेटर्सची मागणी

चीनने खरेदी केलेले ट्रिलियन डॉलर्सचे अमेरिकी कर्जरोखे रद्द करा – अमेरिकन सिनेटर्सची मागणी

वॉशिंग्टन – चीनने अमेरिकेकडून घेतलेले कर्जरोखे चुकते करण्यास अमेरिकन सरकारने नकार द्यावा, अशी मागणी अमेरिकी सिनेटर्सकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ संसद सदस्य मार्शा ब्लॅकबर्न व लिंडसे ग्रॅहम यांनी ही मागणी पुढे केली. कोरोनाव्हायरसच्या साथीसाठी चीनच जबाबदार असून त्यामुळे झालेले अमेरिकेचे नुकसान चीनकडूनच वसूल करून घ्यावे अशी तीव्र भावना अमेरिकन जनता व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. कर्जरोख्यांची जबाबदारी नाकारण्याबाबत पुढे आलेली मागणी याचाच एक भाग आहे.

अमेरिकी कर्जरोखे, ट्रिलियन डॉलर्स

अमेरिकेच्या सरकारवर सुमारे २४ ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्सचे कर्ज असून त्यातील १.०८ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज चीनने अमेरिकी सरकारच्या कर्जरोख्यांद्वारे पुरविले आहे. हे कर्ज अमेरिकी डॉलरच्या रूपात असून चीनच्या तीन ट्रिलियन डॉलर्सहून अधिक असलेल्या परकीय गंगाजळीचा हिस्सा आहे. आपले चलन युआनचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थिर ठेवण्यासाठी चीन सरकारकडून डॉलरच्या या साठ्याचा वापर केला जातो. चीनने घेतलेल्या कर्जरोख्यांवरील व्याज दरवर्षी चुकते करणे अमेरिकी सरकारसाठी बंधनकारक आहे.

मात्र अमेरिका चीन व्यापारयुद्ध आणि कोरोना साथीवरून अमेरिकेने चीनविरोधात सुरू केलेला आक्रमक राजनैतिक संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कर्जरोख्यांचा मुद्दा वारंवार उपस्थित होउ लागला आहे. यापूर्वी अमेरिकेतील काही अभ्यासगट व विश्लेषकांकडून, चीनला धडा शिकवण्यासाठी ‘न्यूक्लिअर ऑप्शन’ म्हणून कर्जरोख्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात होता. पण आता थेट अमेरिकेतील सिनेटर्सकडूनच ही मागणी होऊ लागल्याने याकडे लक्ष वेधले गेले आहे.

अमेरिकी कर्जरोखे, ट्रिलियन डॉलर्स

अमेरिकेच्या टेनेसी प्रांतातील वरिष्ठ सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांनी, अमेरिकन सरकारने चीनला विकलेले कर्जरोखे रद्द करून टाकावेत अशी मागणी केली आहे. ब्लॅकबर्न यांच्या मागणीला अमेरिकी संसदेतील रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी पाठिंबा दिला आहे. ‘चीननेच अमेरिकेला पैसे द्यायला हवेत, अमेरिका चीनला पैसे देणार नाही’, अशा शब्दात सिनेटर ग्रॅहम यांनी कर्जरोख्यांचे जबाबदारी झटकण्याची मागणी उचलून धरली. अमेरिकी सिनेटर्सच्या या प्रस्तावाला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन यु यांनीही समर्थन दिले. चीनमधून पसरलेल्या कोरोना साथीची भरपाई वसूल करण्यासाठी अमेरिकन सरकार हा पर्याय वापरू शकते असे प्राध्यापक यु म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी यापूर्वीच, चीनच्या सत्ताधारी राजवटीला, कोरोना साथीची किंमत चुकती करावी लागेल, असे बजावले होते. जर्मनीने चीनकडे १६५ अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र अमेरिका चीनकडून याहून अधिक नुकसानभरपाईची वसूली करील, ही भरपाई जबर असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. तर, कोरोनाव्हायरसची माहिती दडवून चीनने अमेरिकेची जबर जीवित आणि आर्थिक हानी केली आहे. या हानीची चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला किंमत चुकती करावीच लागेल’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला होता. ही किंमत आर्थिक आणि व्यापारी स्तरावर असेल, असे स्पष्ट संकेतही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिले होते.

दरम्यान, चीनने यावर्षी पहिल्या तिमाहीत अमेरिकी कर्जरोख्यापैकी ३६ अब्ज डॉलर्सचे कर्जरोखे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदी  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info