Breaking News

अमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत

 कॅराकस/वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेने मला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत, फक्त मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, अशा शब्दात व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांनी देशात लोकशाहीवादी बंड घडविण्याचे संकेत दिले. व्हेनेझुएलात गैरमार्गाने पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या निकोलस मदुरो यांच्याविरोधात उघड बंडाचे आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हेनेझुएलातील या बंडाला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचे समोर आले असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी, अमेरिका व्हेनेझुएलातील लोकशाहीसाठी आपला प्रभाव वापरेल, असा उघड इशारा दिला.

गुरुवारी निकोलस मदुरो यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र क्युबा, बोलिविया या लॅटिन अमेरिकी देशांसह रशिया व चीनचा अपवाद वगळता इतर कोणत्याही देशाने मदुरो यांना समर्थन दिलेले नाही. लॅटिन अमेरिकेतील तब्बल १७ देशांनी मदुरो यांची राजवट स्वीकारण्यास नकार दिला असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’ या संघटनेने उघडपणे विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे.

गैदो यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये भव्य सभा घेऊन राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या सत्तेला उघड आव्हान देत असल्याचे जाहीर केले. ‘आपण सर्व एकत्र येऊन व्हेनेझुएलातील स्थिती बदलणार आहोत. आपण सर्व या देशाला वैभवाकडे घेऊन जाणार आहोत’, अशा शब्दात विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मदुरो यांच्याविरोधात नवा संघर्ष सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी २३ जानेवारी रोजी मदुरो यांच्याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असून देशातील लष्करानेही यात सामील व्हावे, असे आवाहन गैदो यांनी केले.

व्हेनेझुएलातील विरोधकांनी दिलेल्या बंडाच्या हाकेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेले काही महिने निर्बंधांच्या माध्यमातून व्हेनेझुएलावर सातत्याने दबाव टाकणार्‍या अमेरिकेने, व्हेनेझुएलातील नव्या आंदोलानाला पूर्णपणे समर्थन देत असल्याची घोषणा केली. ‘अमेरिका निकोलस मदुरो यांच्या बेकायदेशीर राजवटीला मान्यता देत नाही. व्हेनेझुएलातील जनतेने एकत्र येऊन मदुरो यांच्याविरोधात आवाज उठविला आहे. गैदो यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला अमेरिकेचा पाठिंबा आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिका व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीमागे ठामपणे उभी राहिल, असे स्पष्ट केले.

अमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा व युरोपिय महासंघानेही मदुरो यांच्या राजवटीला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

 English  हिंदी  

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info