पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ब्रिटनच्या जनतेचा ‘ब्रेक्झिट’साठी ऐतिहासिक कौल

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ब्रिटनच्या जनतेचा ‘ब्रेक्झिट’साठी ऐतिहासिक कौल

तीन दशकांनंतर ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला संपूर्ण बहुमत

बोरिस जॉन्सन, निवडणुक, कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी, ब्रेक्झिट, व्यापारी करार, लंडन, स्कॉटलंडलंडन- ‘ब्रेक्झिट’ या एकमेव मुद्यावर लढण्यात आलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीत ब्रिटीश जनतेने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला संपूर्ण बहुमत दिले. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार ब्रिटीश संसदेतील ६५० जागांपैकी ३६४ जागा ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ने जिंकल्या आहेत. या निकालाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत करण्यात आले असून अमेरिका, इस्रायल, रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी पंतप्रधान जॉन्सन यांचे स्वागत केले आहे.
गुरुवारी ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणातच सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शुक्रवारी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही तासातच ब्रिटीश मतदारांनी पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. हा निकाल तीन दशकांनंतर ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’ला संपूर्ण बहुमत देणारा निकाल ठरला असून पक्षासाठी ऐतिहासिक विजय ठरला आहे.
बोरिस जॉन्सन, निवडणुक, कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी, ब्रेक्झिट, व्यापारी करार, लंडन, स्कॉटलंडब्रेक्झिट होणारच’ हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेऊन निवडणूक लढलेल्या जॉन्सन यांच्यासह त्यांच्या समर्थकांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचवेळी ‘ब्रेक्झिट’ला विरोध करणार्‍या ‘लेबर’ व ‘लिबरल डेमोक्रॅटिक’ पक्षांना या निकालाने जबरदस्त धक्का दिला आहे. ‘लेबर’ पक्षासाठी हा निकाल १९३५ सालानंतरचा सर्वाधिक धक्कादायक व मोठी घसरण असणारा निकाल ठरला आहे. त्यामुळे या पक्षाचे प्रमुख जेरेमी कॉर्बिन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी ‘लिबरल डेमोक्रॅटिक’च्या प्रमुख जो स्विन्सन निवडणूक हरल्या असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
जॉन्सन यांना ‘ब्रेक्झिट’साठी कौल देतानाच स्कॉटलंड प्रांताने ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ला मोठा विजय मिळवून दिला आहे. निकोला स्टर्जन यांच्या नेतृत्त्वाखाली?लढणार्‍या या पक्षाने तब्बल ४८ जागा जिंकल्या असून हा निकाल पक्षासाठी ऐतिहासिक ठरला आहे. या अभूतपूर्व विजयामुळे स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र होईल, असा अंदाज ब्रिटनमधील राजकीय विश्‍लेषकांनी वर्तविला आहे.
ब्रिटनमधील निवडणुकीत पंतप्रधान जॉन्सन यांना मिळालेल्या विजयाचे जगभरातून स्वागत करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन्सन यांचे अभिनंदन करतानाच आता अमेरिका व ब्रिटनमध्ये महत्त्वाकांक्षी व्यापारी करार पार पडेल, असे संकेत दिले आहेत. युरोपिय महासंघाने जॉन्सन यांना मिळालेल्या समर्थनाचे स्वागत केले असले, तरी युरोपसाठी हा निकाल ‘बॅड डे’ असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. जॉन्सन यांना मिळालेले बहुमत ‘ब्रेक्झिट’ होणारच यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे मत महासंघाच्या नेत्यांनी व्यक्त केले.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info