Breaking News

सिरियातील इराणच्या तळांवर इस्रायलचे जबरदस्त हल्ले – सिरियाचे चार जवान ठार

जेरूसलेम/दमास्कस – अमेरिकेच्या सिरियातील माघारीमुळे इराण अधिक प्रबळ होईल, असे इशारे अमेरिकी सिनेटर्सकडून दिले जात असताना इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर घणाघाती हल्ले चढविले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यात इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’चे शस्त्रास्त्रांचे गोदाम आणि तळ नष्ट झाले. काही तासांपूर्वी सिरियातून इराणच्या लष्कराने इस्रायलच्या दिशेने प्रक्षेपित केलेल्या रॉकेट हल्ल्यांचे हे प्रत्युत्तर असल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. त्याचबरोबर सिरियातून इस्रायलवर हल्ले चढविणार्‍यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही इस्रायलने दिला आहे.

इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रविवारी सिरियातून इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या दिशेने रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले होते. सिरियन राजधानी दमास्कस जवळच्या लष्करी तळांवर तैनात असलेल्या इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’नी इस्रायलच्या गोलान आणि गॅलिली टेकड्यांवर रॉकेट हल्ले चढवून इस्रायलची हवाई सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला होता. पण इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ या हवाई सुरक्षा यंत्रणेने इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’चे हल्ले हाणून पाडले. इस्रायलच्या हर्मन येथील पर्यटनस्थळी ‘स्किंग’ करणार्‍या पर्यटकांनी चित्रित केलेला व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे.

कुद्स फोर्सेसच्या या हल्ल्याला इस्रायलच्या लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. रविवार रात्रीपासून ते सोमवार पहाटेपर्यंत इस्रायलच्या लष्कर आणि लढाऊ विमानांनी सिरियातील किमान दहा ठिकाणी भीषण हल्ले चढविले. यामध्ये सिरियातील इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’चे शस्त्रास्त्रांचे गोदाम, लष्करी तळ आणि क्षेपणास्त्रनिर्मितीचे कारखाने नष्ट केल्याचा दावा केला. सिरियन नागरिकांनी सोशल मीडियावर इस्रायलच्या या कारवाईचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले असून रात्रभर दमास्कसच्या आसपास इस्रायलचे हल्ले सुरू असल्याचे म्हटले आहे.

इस्रायलचे हल्ले रोखण्यासाठी सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. त्यावेळी सिरियाने हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करू नये, असा इशाराही इस्रायलने सिरियन लष्कराला दिला होता. पण सिरियन लष्कराने ही सूचना अमान्य केल्यानंतर इस्रायलला सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेवर कारवाई करावी लागली, असे सांगून इस्रायलच्या लष्कराने या हल्ल्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

इस्रायलच्या या हल्ल्यात सिरियन लष्कराचे चार जवान ठार झाले तर सहा जण जखमी झाल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. तर सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केला नसता तर ही कारवाई झालीच नसती, असे सांगून इस्रायली लष्कराने इराण व हिजबुल्लाहवरील इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात सिरियाने कुठलीही कारवाई करता कामा नये, असे बजावले आहे.

दरम्यान, सिरियाने इराणच्या लष्कराची मायदेशी रवानगी करावी अन्यथा इस्रायलचे सिरियातील हल्ले सुरू राहतील, असा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता. इस्रायलचे सिरियातील हे हल्ले कुणीही रोखू शकत नसल्याचे इस्रायलने ठासून सांगितले होते. अमेरिकेच्या सिरियातील सैन्यमाघारीचाही इस्रायलच्या कारवाईवर परिणाम होणार नसल्याचे इस्रायलने गेल्या आठवड्याभरातील हल्ल्यांद्वारे दाखवून दिले आहे.

इराण इस्रायलबरोबरील निर्णायक युद्धासाठी सज्ज – इराणच्या वायुसेनाप्रमुखांची धमकी

‘Day X’, assassination plot, Dietmar Bartsch, German politicians, conspiracy, Berlin, Adolf Hitler

तेहरान – इस्रायलने सिरियातील कुद्स फोर्सेसच्या ठिकाणांवर चढविलेल्या हल्ल्यावर इराणकडून पहिली प्रतिक्रिया आली. ‘इराणचे लष्कर निर्णायक युद्धासाठी सज्ज आहे. इराणचे हे निर्णायक युद्ध इस्रायलला या जगाच्या नकाशावरून पुसून टाकील’, अशी धमकी इराणच्या वायुसेनेचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल अझिझ नसिरझादेह यांनी दिली.

इराणची वायुसेना इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी तयार असल्याची घोषणा नसिरझादेह यांनी माध्यमांशी बोलताना केली. इराणच्या वायुसेनेची तरुण पिढी इस्रायलला नष्ट करण्यासाठी आतुर बनल्याचा दावा इराणच्या वायुसेनाप्रमुखांनी केला. त्याचबरोबर शत्रू देश इराणवर उघडपणे हल्ले चढवू शकत नाहीत, कारण इराणच्या लष्कराची शस्त्रसज्जता पाहून, इराणवर हल्ले चढविण्याची त्यांची हिंमतच होत नाही, असे नसिरझादेह यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्रायलच्या अधिकार्‍यांनी इराणमध्ये सैन्य घुसवून हल्ले चढविण्याची घोषणा केली होती. इस्रायलच्या या इशार्‍याला इराणच्या वायुसेनाप्रमुखांनी प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे.
दरम्यान, याआधीही इराणच्या सर्वोच्च नेत्यांपासून राष्ट्राध्यक्ष आणि लष्करी अधिकार्‍यांनी इस्रायलच्या विनाशाच्या धमक्या दिल्या होत्या. सिरिया, लेबेनॉन आणि गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ले चढविण्याचे संकेत इराणच्या अधिकार्‍यांनी दिले होते.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info