इराणवरील आत्मघाती हल्ल्याचा सौदी अरेबियावर सूड उगविला जाईल – इराणचे वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी यांची धमकी

इराणवरील आत्मघाती हल्ल्याचा सौदी अरेबियावर सूड उगविला जाईल – इराणचे वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी यांची धमकी

वॉशिंग्टन – ‘सौदीने इराणच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. रिव्होल्युशनरी गार्ड्सवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा इराण सौदी अरेबियावर सूड उगवील. जगभरात कुठल्याही ठिकाणी इराण हा सूड घेऊ शकतो’, अशी धमकी इराणच्या प्रभावी लष्करी गटाचे प्रमुख लफ्टनंट जनरल ‘कासेम सुलेमानी’ यांनी दिली. तसेच पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या पेट्रोडॉलरपासून सावध रहावे. सौदीच्या पेट्रोडॉलर्ससाठी पाकिस्तानने इराण, भारत आणि अफगाणिस्तानला डिवचू नये, असा सज्जड इशारा लेफ्टनंट जनरल सुलेमानी यांनी दिला.

आठवड्याभरापूर्वी इराणच्या ‘सिस्तान-बलोचिस्तान’ प्रांतात ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या वाहनावर दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात २७ जवानांचा बळी गेला होता. पाकिस्तानातील ‘जैश?अल-अदल’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. इराणने देखील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आपल्या सैनिकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप करून इराणने पाकिस्तानी राजदूताला समन्स बजावले होते. पाकिस्तानने या दहशतवादी संघटनांवर कारवाई केली नाही तर इराण पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट करील, असा इशारा इराणच्या नेत्यांनी दिला होता.

पण सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान’ पाकिस्तानच्या दौर्‍यावर असताना इराणने आत्मघाती हल्ल्यांमागे अमेरिका, इस्रायल आणि सौदी असल्याचा ठपका ठेवला होता. इराक आणि सिरियातील संघर्षात इराणच्या ‘कुद्स फोर्स’ या लष्करी तुकडीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल सुलेमानी यांनी देखील इराणी सैनिकांवरील हल्ल्यासाठी सौदीला जबाबदार धरले. तसेच जगभरात कुठल्याही ठिकाणी सौदी अरेबियाच्या हितसंबंधितांवर हल्ले चढवून इराण या हल्ल्याचा सूड घेईल, असा इशारा सुलेमानी यांनी दिला.

सौदी आपल्या पेट्रोडॉलर्सच्या सामर्थ्यावर प्रादेशिक प्रभाव वाढवित असल्याचा आरोप सुलेमानी यांनी केला. सौदीचा हा पेट्रोडॉलर्सचा प्रभाव जास्त काळ टिकणारा नसून लवकरच सौदी अपयशी ठरेल, असा दावा लेफ्टनंट जनरल सुलेमानी यांनी केला. त्याचबरोबर सौदीच्या या जाळ्यात पाकिस्तानने अडकून आपल्या शेजारी देशांबरोबरचे संबंध बिघडवू नये, असा सल्ला सुलेमानी यांनी दिला.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना शेजारी देशांच्या सुरक्षेसाठी याआधीच धोकादायक ठरत आहेत. पाकिस्तानकडून या दहशतवादी संघटनांवर कारवाई झालेली नाही. सौदीच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानने शेजारी देशांसाठी संकटाचे केंद्र बनू नये. तसे झाले तर इराण, भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तानच्या विरोधात खडे ठाकतील, असेही सुलेमानी यांनी पाकिस्तानला बजावले. या क्षेत्रातील तणाव पाकिस्तानचे तुकडे पाडल्यावाचून राहणार नाही, असा खरमरित इशारा कासेम सुलेमानी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info