‘डिजिटल टेररिझम’चे परिणाम सर्वसंहारक शस्त्रांइतकेच घातक – रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

‘डिजिटल टेररिझम’चे परिणाम सर्वसंहारक शस्त्रांइतकेच घातक – रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

मॉस्को  – जगभरात सध्या दहशतवाद व कट्टरपंथियांशी जोडलेल्या सुमारे ३० हजार वेबसाईट्स आहेत. दहशतवादी संघटना त्यांचा वापर विविध प्रकारच्या कारवायांसाठी करतात. इंटरनेटच्या माध्यमातून होणार्‍या या कारवाया ‘डिजिटल टेररिझम’चा भाग असून दहशतवादाचा हा प्रकार सर्वसंहारक शस्त्रांइतकाच (वेपन्स ऑफ मास ड्रिस्ट्रक्शन) धोकादायक परिणाम घडविणारा ठरतो, असा इशारा रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’च्या अधिकार्‍यांनी दिला.

रशियातील उफा शहरात जागतिक सुरक्षेला असणारे धोके या विषयावरील आंतरराष्ट्रीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’चे उपसचिव युरी कोकोव यांनी तंत्रज्ञान व त्याचबरोबर सायबरक्षेत्रातील वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधले. ‘तंत्रज्ञान तसेच सायबरक्षेत्रातील दहशतवादाचे युग सुरू होत आहे’, अशा शब्दात कोकोव यांनी येत्या काही वर्षात या क्षेत्रातील धोके व त्याचे परिणाम वाढतच जातील, याची जाणीव करून दिली.

‘तंत्रज्ञान व सायबरक्षेत्रातील दहशतवादाचे परिणाम अतिशय घातक असून या परिणामांची तुलना दहशतवाद्यांकडून सर्वसंहारक शस्त्रांचा वापर झाल्यावर जी हानी होईल त्याच्याशी करता येईल’, असा गंभीर इशारा रशियन अधिकार्‍यांनी दिला. सध्या इंटरनेट हे दहशतवादी संघटनांच्या हातचे मुख्य साधन बनले आहे, याकडेही ‘सिक्युरिटी कौन्सिल’च्या उपसचिवांनी लक्ष वेधले.

‘दहशतवादी संघटनांनी इंटरनेटचा वापर करून जगभरात विखुरलेले समर्थक तसेच सदस्यांना एकत्र ठेवण्यात यश मिळवले आहे. दहशतवादी कारवायांसाठी लागणारा निधी तसेच साधने मिळविण्यासाठीही इंटरनेटचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या जगभरात दहशतवादी संघटनांकडून सुमारे ३० हजार वेबसाईट्सचा वापर करण्यात येत आहे’, असे रशियन अधिकारी कोकोव यांनी बजावले.

दहशतवादी संघटनांकडून होणारा इंटरनेटचा वापर ‘वेपन्स ऑफ मास ड्रिस्ट्रक्शन’च्या परिणामांइतका घातक असल्याचे सांगतानाच, दहशतवादी गट त्यांच्या कारवायांसाठी इंटरनेटच्या सहाय्याने ‘वेपन्स ऑफ मास ड्रिस्ट्रक्शन’ व त्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची जाणीवही रशियन अधिकार्‍यांनी करून दिली. आण्विक, रासायनिक तसेच जैविक हल्ले चढविण्यासाठी आवश्यक माहिती व घटक मिळविण्यासाठीही दहशतवादी गट इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसून आले आहे, असा दावा रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’चे उपसचिव युरी कोकोव यांनी केला.

गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशांनी, दहशतवादी गटांकडून इंटरनेटचा होणारा वापर व त्याचे धोके यावर सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांनी त्याविरोधात कायदेही केले असले तरी ते पुरेसे ठरलेले नाहीत. त्यातील पळवाटांचा वापर करून दहशतवादी गट आपला प्रचार तसेच कारवायांसाठी सायबरक्षेत्राचा आक्रमक वापर करीत असल्याचे समोर आले असून या पार्श्‍वभूमीवर, रशियन अधिकार्‍यांनी बजावलेला इशारा जगाचा थरकाप भरविणारा ठरतो.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info