‘तेल अविव’वर रॉकेट हल्ल्यांनंतर – इस्रायलचे गाझातील हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले

‘तेल अविव’वर रॉकेट हल्ल्यांनंतर – इस्रायलचे गाझातील हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले

तेल अविव – गाझापट्टीतील ‘हमास’च्या १०० ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले चढवून इस्रायलने आपल्या ‘तेल अविव’ शहरावरील रॉकेट हल्ल्यांचा सूड?घेतला. गुरुवारी रात्री इस्रायलची आर्थिक राजधानी मानल्या जाणार्‍या ‘तेल अविव’ शहरावर गाझापट्टीतून रॉकेटहल्ले झाले होते. यानंतर खवळलेल्या इस्रायलने गाझातील ‘हमास’च्या ठिकाणांवर हल्ले चढवून या हल्ल्याला ‘हमास’च जबाबदार असल्याचा आरोप केला. इस्रायलच्या प्रमुख शहरांवर रॉकेटहल्ले चढविण्याची धमकी ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’ या गाझातील संघटनांनी दिली होती. तसे झाल्यास याचे भीषण परिणाम होतील, असे इस्रायलने बजावले होते.

इस्रायलच्या ‘तेल अविव’ पासून ते दक्षिणेकडील शहरांचा वेध घेतील, असे रॉकेट्स, क्षेपणास्त्र आपल्याकडे असल्याचा दावा हमास आणि इस्लामिक जिहाद या गाझातील दहशतवादी संघटनांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. इस्रायलचे लष्कर रोखू शकणार नाहीत, इतके हल्ले इस्रायली शहरांवर चढवू, अशी धमकी या संघटनांनी दिली होती. गुरुवारी रात्री उत्तरेकडील ‘तेल अविव’वर रॉकेट हल्ले चढवून गाझातील दहशतवाद्यांनी आपली धमकी खरी करून दाखविली. गाझातून ‘तेल अविव’वर नऊ रॉकेट्स डागण्यात आले होते. पण इस्रायलने आपल्या प्रत्येक शहरांच्या आणि सीमारेषेच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या ‘आयर्न डोम’ या हवाई सुरक्षा यंत्रणेने यापैकी सात रॉकेट हवेतच भेदली. मात्र यातील दोन रॉकेट्स तेल अविव शहरात कोसळली.

गाझातून झालेल्या या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नाही. पण याने खवळलेल्या इस्रायलने अवघ्या काही मिनिटातच गाझापट्टीच्या दिशेने लढाऊ विमाने रवाना करून हमासच्या शंभर ठिकाणांना लक्ष्य केले. तेल अविववर झालेल्या हल्ल्यांशी आपला संबंध नसल्याचे हमासने म्हटले आहे. पण हमासची सशस्त्र संघटना ‘अल कासम ब्रिगेड’ने हा हल्ला चढविल्याचा आरोप इस्रायलने केला. तसेच आपण प्रत्युत्तरादाखल केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे दहशतवादी तळ, शस्त्रनिर्मितीचा कारखाना, शस्त्रास्त्रांचे कोठार तसेच समारिया व रिमाल येथील हमासची मुख्यालये आणि भूमिगत रॉकेटनिर्मितीचा कारखाना यांना ‘टार्गेट’ केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला प्रत्युत्तर मिळेल, अशी एका ओळीची प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिली.

दरम्यान, पुढच्या महिन्यात इस्रायलमध्ये निवडणूक होणार आहे. या काळात इस्रायलच्या प्रमुख शहरांवर हल्ल्ला चढविण्याची धमकी ‘हमास’ व हिजबुल्लाह’चा प्रमुख नसरल्लाह याने दिली होती. इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यान्याहू यांना रोखायचे असेल, तर याच काळात इस्रायलवर हल्ले चढविणे भाग आहे, असे नसरल्लाह म्हणाला होता. पण निवडणुकीचा फायदा घेऊन आपण इस्रायलवर हल्ले चढवू शकतो, या भ्रमात दहशतवाद्यांना राहता कामा नये, त्यांना या हल्ल्याचे भयंकर उत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टी तसेच लेबेनॉन आणि सिरिया सीमेेवरील सज्जता वाढविली होती.

गाझातील हमास व इस्लामिक जिहाद या संघटनांप्रमाणे लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि सिरियाच्या सीमारेषेवर इराण आणि हिजबुल्लाहचे दहशतवादी संयुक्तपणे इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इस्रायलकडून केला जातो. ‘तेल अविव’वर रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलवरील सर्वच राजकीय पक्ष संतप्त प्रतिक्रिया देत असून ‘हमास’वर कठोर कारवाई करण्याची मागणी आपल्या सरकारकडे करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर इस्रायलमध्ये राष्ट्रीय पातळीवर एकवाक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info