सौदी इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याचा निर्णय – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

सौदी इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याचा निर्णय – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन – ‘सौदी अरेबियातील इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे टंचाई निर्माण होऊन इंधनाच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर, आवश्यकता भासल्यास अमेरिकेत आपत्कालिन परिस्थितीसाठी राखीव ठेवलेल्या इंधनाच्या साठ्यांमधून आवश्यक इंधनाचे साठे मोकळे करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष म्हणून देण्यात येत आहेत. इंधनाच्या बाजारपेठेत कमतरता भासू नये इतक्या प्रमाणात त्याचा वापर करण्याची परवानगी देण्यात येत आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेत सौदीच्या क्राऊन प्रिन्सने अमेरिकेकडे शस्त्रसहाय्य व इतर मदतीची मागणी केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही सौदी अरेबियाला आवश्यक ते सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याबाबत तातडीने घेतलेला निर्णय लक्ष वेधणारा ठरतो.

१९७५ साली अरब देशांनी अमेरिकेला कच्च्या तेलाची विक्री बंद केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ विकसित करण्यात आले होते. सध्या अमेरिकेत ६४.४८ कोटी बॅरल्स इतके कच्चे तेल ‘धोरणात्मक साठा’ म्हणून ठेवण्यात आले आहे. अमेरिकेच्या टेक्सास व लुईझियाना प्रांतातील किनारपट्टीनजिक चार ठिकाणी ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ अंतर्गत इंधनाचे साठे राखून ठेवण्यात आले आहेत. या भागात एकूण ७२ कोटी बॅरल्सहून अधिक इंधन ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ म्हणून साठवून ठेवण्याची क्षमता आहे.

अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी तीन वेळा ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’मधील इंधनाचा वापर करण्यात आला आहे. जून २०११ मध्ये लिबियातील संघर्षादरम्यान कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत झालेल्या उलथापालथींच्या पार्श्‍वभूमीवर ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’मधून सुमारे तीन कोटी बॅरल्स कच्चे तेल बाहेर काढण्यात आले होते. त्यापूर्वी २००५ साली अमेरिकेत झालेल्या ‘कतरिना चक्रीवादळा’च्या पार्श्‍वभूमीवरही ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’चा वापर करण्यात आला होता.

१९९१ साली अमेरिकेने आखातात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’दरम्यान सर्वात पहिल्यांदा ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याचा निर्णय तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ‘जॉर्ज एचडब्ल्यू बुश’ यांनी घेतला होता. शनिवारी सौदी अरेबियातील इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाचा पुरवठा तब्बल पाच टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तातडीने ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करण्याबाबत घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जातो.

अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’ खुले करतानाच टेक्साससह इतर प्रांतांमधील तेलवाहिन्यांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेशही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info