Breaking News

‘साऊथ चायना सी’मध्ये फिलिपाईन्सच्या बेटाला चीनच्या जहाजांचा वेढा

मनिला, दि. २ (वृत्तसंस्था) – ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या वाढत्या हालचालींवर फिलिपाईन्सची नाराजी वाढत चालली आहे. या सागरी क्षेत्रावर आपलाच अधिकार असल्याचा दावा करणार्‍या चीनने फिलिपाईन्सच्या ‘थिटू’ बेटांच्या हद्दीत सुमारे २७५ जहाजांचे ‘स्वार्म’ रवाना करून फिलिपाईन्सच्या बेटाला घेराव टाकला आहे. चीनच्या या सागरी आक्रमकतेवर तीव्र नाराजी व्यक्त करून फिलिपाईन्सने या सागरी क्षेत्रातील आपली गस्त वाढविली आहे.

फिलिपाईन्सचे लष्करप्रमुख जनरल बेंजामिन मॅड्रिगल ज्युनिअर यांनी चीनच्या या कारवायांची माहिती उघड केली. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील ‘थिटू’ बेटाला सुमारे २७५ जहाजांनी घेराव टाकल्याचा आरोप जनरल बेंजामिन यांनी केला. चीन फिलिपाईन्सच्या बेटांवर अशाप्रकारे जहाजांचे हल्ले चढवून आपल्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका जनरल बेंजामिन यांनी ठेवला. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत पहिल्यांदाच असे घडलेले नाही, असे सांगून याआधीही चीनच्या शेकडो जहाजांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याची आणि बेटांना घेराव घातल्याची आठवण लष्करप्रमुखांनी करून दिली.

चीनच्या जहाजांचा हा हल्ला फिलिपाईन्सच्या संरक्षणदलांसाठी आव्हान असल्याचा इशारा जनरल बेंजामिन यांनी केला. त्यामुळे फिलिपाईन्सने आपल्या सागरी क्षेत्रातील गस्त वाढविण्याचा निर्णय घेतल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. यानंतर फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविरोधात निषेध नोंदविला आहे. पण चीनने फिलिपाईन्सचा हा आरोप फेटाळला आहे. ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात आपली जहाजे मासेमारी करण्यासाठी गेली आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र या चीनच्या मच्छिमार नौका नसून लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या ‘मिलिशिया’ जहाजे असल्याचा दावा फिलिपाईन्स करीत आहे.

गेल्या काही वर्षात चीन आणि फिलिपाईन्समध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले असून राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनबरोबर व्यापारी सहकार्य वाढविण्याला प्राधान्य दिले आहे. पण ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील वादाबाबत फिलिपाईन्सची भूमिका कायम आहे. फिलिपाईन्सच्या परराष्ट्र तसेच संरक्षण मंत्रालय आणि लष्कराकडून आपल्या सागरी क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींना विरोध केला होता. ‘साऊथ चायना सी’तील इतर सागरी क्षेत्राप्रमाणे चीन आपल्या सागरी हद्दीतील बेटांचाही ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फिलिपाईन्स करीत आहे.

‘साऊथ चायना सी’वर आपलाच अधिकार असल्याचा दावा करून चीनने लष्करी सामर्थ्याच्या जोरावर येथील बहुतांश सागरी क्षेत्रावर नियंत्रण मिळविले आहे. हे करीत असताना चीनने फिलिपाईन्स, व्हेनेझुएला, तैवान, मलेशिया, ब्रुनेई या देशांचे दावे फेटाळले आहेत. तर फिलिपाईन्सप्रमाणे चीनने याआधी ‘साऊथ चायना सी’मधील पॅरासेल द्वीपसमुहांच्या हद्दीत अशाचप्रकारे जहाजांची झुंड व्हेनेझुएलाच्या सागरी हद्दीत रवाना केले होते.

दरम्यान, फिलिपाईन्सचे सागरीक्षेत्र आणि येथील बेटांवर राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली नाही तर लवकरच चीन या बेटांबरोबर फिलिपाईन्सचा देखील ताबा घेईल. फिलिपाईन्स चीनचा एक प्रांत म्हणून ओळखला जाईल, असा इशारा या देशातील लष्करी विश्‍लेषकांनी दिला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info